लासलगाव:(आसिफ पठाण) कासारसाई (संत तुकाराम महाराज साखर कारखाना) येथील एल एक्स टी (LXT) स्केटिंग ग्राउंडवर २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘एनडुरन्स स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये लासलगावचा सुपुत्र कु. वरद यशवंत सावकार याने चमकदार कामगिरी करत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन कांस्य (Bronze) पदके मिळवून दिली. अंडर-८ गटात वरद सावकारने तिसरा क्रमांक पटकावत भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.
या भव्य जागतिक स्केटिंग स्पर्धेत १२ पेक्षा अधिक देशांतील ४५० हून अधिक स्केटर्सनी सहभाग नोंदवला होता. केनिया, यूएई, नेपाळ, मलेशिया, मालदीव, सौदी अरेबिया, फिलिपिन्स, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, थायलंड, सेनेगल अशा विविध देशांतील खेळाडूंच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. या स्पर्धेत तीन कांस्यपदके मिळवून वरदने लासलगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
स्केटिंग स्पर्धेतील या दैदिप्यमान यशाबद्दल कु. वरद सावकारला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साहाय्यक मंगेश चिवटे यांच्या हस्ते मेडल आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. यावेळी इंडुरन्स वर्ल्डचे अध्यक्ष योगेश कोरे, सचिव दशरथ बंड, सहसचिव सतीश सिंग यांनी वरदचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
वरदच्या या आंतरराष्ट्रीय यशामागे ‘विसा स्केटिंग अकॅडमी’चे प्रशिक्षक शाम चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आंतरराष्ट्रीय विजेता ठरलेल्या वरदच्या यशाबद्दल त्याच्या कुटुंबाने आनंद व्यक्त करत प्रशिक्षक शाम चौधरी सरांचे विशेष आभार मानले. विसा स्केटिंग अकॅडमीनेही वरदला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त १४०० विद्यार्थ्यांची ‘संविधान गुणगौरव परीक्षा २०२५’ उत्साहात संपन्न!
रायगडच्या ‘सुजाण नागरिक फोरम’ आणि लासलगावच्या ‘शीलामोती संस्थे’चा संयुक्त उपक्रम; निफाड, येवला तालुक्यातील १४ केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद.
लासलगाव:
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून, देशाच्या संविधानाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी, जनजागृती व्हावी आणि त्यांच्यात संविधानाची मूल्ये रुजावीत या उदात्त उद्देशाने ‘सुजाण नागरिक फोरम, रायगड’ आणि ‘शीलामोती बहुउद्देशीय संस्था, लासलगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने “२६ नोव्हेंबर संविधान गुणगौरव परीक्षा २०२५” हा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता. निफाड व येवला तालुक्यातील एकूण १४ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सुमारे १४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मोतीराम अहिरे यांच्या नेतृत्वाखालील शीलामोती बहुउद्देशीय संस्थेतर्फे या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पहिली ते आठवी (लहान गट), नववी ते बारावी (मध्यम गट) आणि बारावी नंतरचे विद्यार्थी (मोठा गट) अशी गटवारी करण्यात आली होती. १०० गुणांची ही लेखी परीक्षा विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये ऑफलाइन पद्धतीने दिली. या परीक्षेतून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी लासलगाव परिसरातून महावीर हायस्कूल, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, एन व्ही पी मंडल इंग्लिश मीडियम स्कूल, सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट (SDA) हायस्कूल, सरस्वती विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल , न्यू इंग्लिश स्कूल टाकळी तसेच विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल आणि गोंदेगाव येथील प्राथमिक शाळा व व्ही एन नाईक हायस्कूल अशा अनेक नामवंत शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या उपक्रमाला हातभार लावला.
परीक्षेच्या पूर्वार्धात सर्व सहभागी शाळांमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले आणि त्यानंतर उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले. या उत्साही वातावरणानंतर सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडली.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशासाठी प्रत्येक शाळेतील प्राचार्य आणि शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. विशेष म्हणजे, संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती. या समाजोपयोगी कार्याला लासलगाव परिसरातील वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दानशूर व्यक्तींचे विशेष सहकार्य लाभले. संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


























