संकटावर मात करण्याकरिता उवसग्गहरम मंत्र जीवनात अत्यंत महत्वाचे: शोभाताई धारीवाल

🌍 पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरणाचे रक्षण गरजेचे – शोभाताई आर. धारीवाल

प्रतिनिधी वृत्त

जैन धर्मातील संस्कार व मूल्यांची परंपरा हजारो वर्षांपासून समाजाला दिशा देत आली आहे. संकटावर मात करणारा “उवसग्गहरं मंत्र” याचे सामूहिक जप समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, असा विश्वास शोभाताई आर. धारीवाल यांनी व्यक्त केला.

त्यांच्या मते, रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशन दरवर्षी सामूहिक स्तोत्र पठण व जपाचे आयोजन करते. यामुळे समाजात सकारात्मक भावनांचे संचार होतात आणि केवळ जैन समाजच नव्हे तर अजैन समाजातील भाविकही या उपक्रमाचा लाभ घेतात. यावर्षी या स्तोत्र जपाचे आयोजनाचे नववे वर्ष असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वयंप्रेरणेने उपस्थित राहिल्याबद्दल शोभाताई यांनी स्वागत व आभार मानले.

आर.एम.डी. फाऊंडेशनचे कार्य

आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात फाऊंडेशन देशभर कार्यरत आहे. गरजू व बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, अत्यवस्थ शाकाहारी रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. झपाट्याने सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात “वृक्षपुनर्रोपण” हा प्रभावी उपाय राबवला जात असून फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २१०० हून अधिक झाडे वाचवण्यात यश आले आहे.

पर्यावरण रक्षणाचा ध्यास

शोभाताई धारीवाल यांनी स्पष्ट केले की, “पृथ्वीला वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे हाच एकमेव मार्ग आहे.” त्यांनी यावर्षी डीजे-मुक्त दहीहंडी साजरी करणाऱ्या बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांचे कौतुक केले आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतल्याबद्दल जान्हवी धारीवाल बालन व पुनीत बालन या दोघांचे अभिनंदन केले.

सामूहिक जप सोहळा

दिनांक १७ ऑगस्ट २०२५, रविवार, सायं. ४ वाजता बिबवेवाडी (पुणे) येथील श्रीमान रसिकलाल एम. धारीवाल स्थानक येथे सामूहिक “उवसग्गहरं स्तोत्र” जपाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात पद्मश्री आचार्य चंदनाजी, पू. मुकेश मुनिजी, पू. जयप्रभ विजयजी व पू. आगमचंद्रजी स्वामी यांची उपस्थिती होती. आचार्य चंदनाजी यांनी लहान वयातच समाजकार्याला लागलेल्या जान्हवी धारीवाल बालन यांच्या कार्याचे कौतुक केले. पू. जयप्रभ विजयजी यांनी स्तोत्राचे महत्त्व पटवून सांगितले, तर पू. आगमचंद्रजी स्वामी व पू. मुकेश मुनिजी यांनी अशा सामूहिक जप उपक्रमांना समाजासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला श्री पुनीत बालन, पोपटशेठ ओसवाल, वालचंदजी संचेती, विजयकांतजी कोठारी, अचल जैन, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक तसेच शोभाताई आर. धारीवाल वसतिगृह (एफसी रोड व चिंचवड), शोभाबेन आर. धारीवाल छात्रालय (डेक्कन) येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी, विविध गणेश मंडळे, आळंदी वारकरी संप्रदायाचे भाविक आणि जैन-अजैन बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्तोत्र पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *