चांदवड | महेंद्र गुजराथी
चांदवड तालुक्यातील वृध्द महिला श्रीमती चंद्रभागाबाई ठकाजी संसारे (वय ८१) हीस तिच्या मुलीने फसवणुक करून रापली ता. चांदवड येथील गट नं. २९ ही मिळकत कोणतीही रक्कम न देता खरेदीखत करून घेतल्याची घटना घडली होती व त्यावरून मिळकतीचे रेकॉर्डला नोंद नं. ८८१ ही देखील प्रमाणित झाली होती. त्यानुसार सदर वृध्द महिलेने आईवडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ चे कलम ५ व २३ (ब) प्रमाणे चांदवडचे पीठासीन अधिकारी, ज्येष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांचे कोर्टात केस दाखल केली होती. उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक श्रीमती देवयानी व्यास यांनी सर्व कागदपत्राची पडताळणी करून मदत केली.
या पिडीत वृध्द महिलेचा अर्ज मंजूर करून रापली येथील गट नं. २९ वर श्रीमती चंद्रभागाबाई ठकाजी संसारे हीचे नाव पुन्हा दाखल करण्याबाबतचा आदेश पारीत केला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरीकांना न्याय मिळाला असून वृध्द महिलेची फसवणुक करून गेलेली शेतजमिन पुन्हा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या निर्णयामुळे परत मिळाल्यामुळे जेष्ठ नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी चांदवडचे पीठासीन अधिकारी, ज्येष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग म्हणाले की, जी मुले, मुली आपल्या वृध्द आईवडीलांना सांभाळत नसतील तर अशा पिडीत वृध्द आईवडीलांनी ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ चे कलम ५ व २३ (ब) प्रमाणे पिडीत वृध्दांनी अर्ज दाखल केल्यास त्यास योग्य तो न्याय दिला जातो असे त्यांनी सांगितले. पिडीत वृध्द महिलेला अर्ज लिहिणे व मार्गदर्शन चांदवड वकील संघाचे अॅड. संग्राम थोरात यांनी केले.
—————


























