युवचार्य महेंद्र ऋषिजी म. सा.
महान विभूतींचा आदर्श सुद्धा महान व विराट असतो. सरळ व निष्कपट आत्म्यामध्येच सम्यक ज्ञान व सम्यक दर्शन ची ज्योत प्रज्वलित होते. सर्जन आणि विसर्जन ह्या सृष्टीच्या अतूट प्रक्रिया आहेत. पूर्व जन्माचे संचित कर्म उदयास आल्यानंतर प्रकृतीच्या महान कृपेने विश्वामध्ये अशा विद्वान कर्तबगार विभूती निर्माण झालेल्या दिसतात. आचार्य भगवंत श्री आनंद ऋषीजींना आपल्या घरी आणण्यासाठी बालक मंजू ने हात पकडला तो कधीच साथ न सोडण्यासाठीच. ज्यांना केवळ वयाच्या सातव्या वर्षी गुरु सानिध्यात वैराग्याचे बीज अंकुरित झाले त्यांच्या सुदृढ वैराग्य भावनेला कोणीही रोखू शकले नाहीत. बालक मंजू वयाच्या पंधराव्या वर्षी पुणे येथे सादडी सदनात ३-२-१९८२ ला दिक्षित होऊन महेंद्र ऋषीजी बनले. प्रगाढ भक्ती, विनय व श्रद्धेद्वारे गुरुदेवांचे मन जिंकून घेतले. गुरुदेवांनी शिष्य निर्माण करण्याचे कार्य लिलया पार पाडले व विनीत शिष्याने ते मनोभावे स्वीकारले.
युवाचार्य प.पू. श्री महेंद्र ऋषीजींचा जन्म पुणे जिल्ह्यात चाकण गांवात ५ ऑक्टोबर १९६७ मध्ये राहू निवासी धर्मनिष्ठ सुश्रावक स्वार्थीलालजी नेनसुखजी भटेवरा यांच्या सुपुत्र रुपात माता सौ. लीलादेवी यांच्या कुक्षीत झाला. बालकाचे नाव महेंद्र, मंजू ठेवण्यात आले. हाच बालक महेंद्र ऋषीजी बनुन गुरुआज्ञा सर्वोपरी हा संकल्प घेऊन संयमपथावर अग्रेसर झाला. त्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत, प्राकृत, गुजराती, इंग्लिश, राजस्थानी भाषेवर प्रभुत्व मिळविले. अनेकानेक संस्कृत श्लोक, दोहे मराठी अभंग, सुभाषित कंठस्थ केले. ते विद्वान पंडित व आगमशास्त्राचे ज्ञाता बनले. त्यांचा मनमिळाऊ स्पष्ट व मधुर स्वभाव , शांत मनोवृती ,हसमुख चेहरा ,प्रभावी प्रवचन शैली सगळ्यांचे आकर्षण बिंदू ठरली. संस्कृत, प्राकृत, न्याय दर्शन, आगम आदी विषय ते साधू – साध्वीना शिकवू लागले. गुरुजणांप्रति श्रद्धा, आदरभाव व छोट्याविषयी स्नेहभाव त्यांच्यात सदैव आढळून येतो. आपल्या मुनिजीवनात २०१२ मध्ये श्रमण संघिय मंत्री व २०१५मध्ये युवाचार्य असा उत्तरोत्तर विकास झाला.
युवाचार्य बनल्यानंतर आत्मध्यान आणि आत्मज्ञान वर लक्ष केंद्रित करून वितराग धर्माचे मर्म आत्मसात केले. त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छ्तीसगड मध्ये पदयाञेने विचरण केले. त्यांनी आपले चातुर्मास आवडम्बर रहित साधनामय, ज्ञान,दर्शन,चारित्र,तप रुपात संपन्न करुन जनसामान्यांच्या धर्म आराधनेसाठी प्रयत्न केले. तप साधनेवर भर दिला.ते स्वत: गत १४ वर्षांपासुन एकांत्तर एकासना तप साधनेत लीन आहेत. त्यांचे पू.हितेन्द्रमुनिजी व पू.धवलऋषिजी हे दोन होनहार शिष्य आहेत. साहित्याचे महत्त्व ओळखून त्यांनी आनंद के सरगम, सुमरण जिनेश्र्वरोंवरोका, गुरु आनंद प्रसादी,आनन्द के स्वर,आनंद स्तोक महत्व आदि साहित्यांचे सर्जन केले. त्यांना जिनशासन प्रभावक, विदर्भ शिरोमणी, प्रज्ञा महर्षी, आगम रत्नाकर, युवा हृदय सम्राट, श्रुतमहोदधी इत्यादी पदव्यांनी सन्मानित केले.
त्यांनी श्रमण संघीय व्यवस्थेवर लक्ष केंन्द्रित करुन संघटनात्मक एकतेवर भर दिला. त्यांच्या दृष्टीने सर्वांचे मत ऐकून घेणे आणि त्यांना उचित सन्मान देणे हेच जैन एकतेचे मुख्यसूत्र असले पाहिजे. त्यांच्या मतानुसार आपले संस्कार सिद्धांत आणि विचारानुसार उचित कार्य करण्यासाठी लोकांनी राजनिती मध्ये प्रवेश करणे अनिवार्य आहे. जैन संतांच्या विशिष्ट आचार संहितेत कालमानानुसार, सोयिस्कर बदल करने गरजेचे आहेत परंतू ते करतांना जैन परंपरेचे जे प्राणतत्व, मुख्य गाभा आहे त्यात परिवर्तन करणे स्वीकारार्ह नाही. आपल्या कारकिर्दीत श्रमण संघ मजबूत सुदृढ व्हावे हिच मंगल कामना।
डाॅ. पारस सुराणा
अध्यक्ष केवलिबन श्री संघ नाशिक


























