उमराणे (वार्ताहर): शासनाने मक्यासाठी ₹ २४०० प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असतानाही, प्रत्यक्षात बाजारात शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दराने मका खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. या अन्यायाविरुद्ध शासनाला जागे करण्यासाठी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी वर्गाच्या वतीने आज, मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता उमराणे येथील स्वर्गीय निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मक्का मार्केट) आवारात ‘ठिय्या आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाची सुरुवात प्रहार संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके यांनी आपल्या गळ्यात दोरीचा फास अटकून (प्रतिक म्हणून) केली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि “मक्याला २४०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रमुख नेत्यांचा पाठिंबा आणि मागण्या
या आंदोलनाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद वाघ, माजी सभापती धर्मांअण्णा देवरे, रतन देवरे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे, बाजार समिती सचिव तुषार गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला.
आंदोलनाचे वृत्त कळताच, आमदार बच्चू कडू यांनी उपोषणकर्त्यांशी संपर्क साधला असून, दोन दिवसांत आंदोलनात सामील होणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षण मंत्री नामदार भुसे यांनीही शासनाने ₹ २४०० भावाने मका खरेदी करावी, या मागणीचे पत्र शासनास दिले आहे. तसेच, नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले आमदार श्रीकांत शिंदे हे देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट थांबवा!
शेतकऱ्यांची नेमकी समस्या अशी आहे की, शासनाने मक्याला ₹ २४०० हमीभाव निश्चित केला असताना, सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याची खरेदी अवघ्या ₹ १२०० ते ₹ १५००, आणि जास्तीत जास्त ₹ १८०० दराने होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटलमागे थेट ₹ ६०० ते ₹ १२०० चा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
प्रहार संघटनेने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, जोपर्यंत शासन हमीभावाने मका खरेदी सुरू करत नाही, तोपर्यंत ही लूट थांबणार नाही.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
* तातडीने खरेदी केंद्रे: शासनाने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तात्काळ हमीभावाने (₹ २४००) मका खरेदी सुरू करावी.
* भावांतर योजना: खरेदी सुरू होईपर्यंत ‘भावांतर योजना’ लागू करून, हमीभाव व आजचा बाजारभाव यातील फरक शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावा.
* २०२५ चा भावांतर फरक: २०२५ च्या खरीप हंगामातील मक्यालाही भावांतर फरक मिळावा.
* कांदा अनुदान: २०२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ₹ १५०० च्या खाली कांदा विकला, त्यांना ₹ १००० प्रति क्विंटल अनुदान त्वरित द्यावे.
यावेळी बोलताना प्रहार शेतकरी संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष हरसिंग छबु ठोके म्हणाले, “जर शासन हमीभाव जाहीर करते, तर खरेदी केंद्रे सुरू करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाची ही लढाई आता शेतकऱ्यांनाच लढावी लागणार आहे.” आंदोलनात माजी सरपंच शिवाजी आहेर, रत्नाकर देवरे, संदीप देवरे, माधव शिरसाट, विकास देवरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
हमीभाव मिळेपर्यंत माघार नाही! ; उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘प्रहार’चा एल्गार; मक्याला २४०० रु. हमीभावाने खरेदीसाठी ‘ठिय्या आंदोलन’ सुरू


























