पारध बु. (श्री महेंद्र बेराड सर,भोकरदन तालुका प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात गावातील अण्णाभाऊ साठे सभागृहात महापुरुषांना अभिवादन करून झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून समाज प्रबोधनावर मोलाचे विचार मांडले.
प्राध्यापक अनिल मगर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध ‘फकिरा’ कादंबरीवर सविस्तर व्याख्यान दिले. निवृत्त शिक्षक रामराम रिंढे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्याचा वेध घेत त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षक श्री. गावंडे, ग्रामविकास अधिकारी संजय पुरी, पत्रकार संघटनेचे तालुका उपप्रमुख रवी लोखंडे आणि लोककलावंत शाहीर सुभाष सुरडकर यांनीही आपले विचार मांडून अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व सांगितले.
सायंकाळी ६ ते १० या वेळेत अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक शांततेत काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले. बाबुराव काकफळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदाबाई काकफळे होत्या. या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्राध्यापक राजाराम डोईफोडे, पोलीस जमादार प्रकाश सिनकर, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ लोखंडे, गणेश लोखंडे, सुनील डोईफोडे, साहेबअली शाह, पत्रकार रवी लोखंडे, रामसिंग ठाकूर, तेजराव दांडगे, कृष्णा लोखंडे, श्री महेंद्र बेराड सर यांचा समावेश होता. तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक दांडगे आणि उपाध्यक्ष महादू दांडगे, गणेश दांडगे सह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.






















