पाटोदा (गणेश शेवाळे) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पाटोद्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती निमित्त पाटोदा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी,अनेक मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेले रक्तदान शिबिर हे समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारे ठरले. या शिबिरात तरुणांनी, महिला-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेचे अनोखे उदाहरण घडवले. जमा झालेल्या रक्ताच्या पिशव्या भविष्यात गरजू रुग्णांच्या मदतीस धावून जाणार आहेत. हा उपक्रम आरोग्य संवर्धन व सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जागवणारा ठरला कार्यक्रमात युवानेते सागर धस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर सखोल भाष्य करत उपस्थित तरुण वर्गाला प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,”अण्णाभाऊ साठे हे केवळ एक साहित्यिक नव्हते, तर ते एक क्रांतिकारी विचारवंत, लोककवी, आणि वंचित समाजाचे समर्थ प्रवक्ते होते. त्यांनी समाजातील विषमता, अन्याय, शोषण यावर लेखणीच्या माध्यमातून प्रहार करत दलित- वंचितांच्या जिव्हाळ्याचा आवाज निर्माण केला. त्यांच्या विचारांवर चालणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.” धस यांनी उपस्थित तरुणांना आवाहन करताना सांगितले की, “समाज बदलण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. अण्णाभाऊंच्या जीवनातून प्रेरणा घेत आपण सामाजिक समतेसाठी, शिक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे.”कार्यक्रमात अनेक मान्यवरांची भाषणे, अनुभव कथन, आणि सामूहिक घोषणांमधून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती सांगण्यात आली. संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण होते आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.कार्यक्रमाची सांगता सामूहिक अभिवादन, रक्तदात्यांचा सत्कार व आभार प्रदर्शनाने करण्यात आली.या अभिवादन सोहळा आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण तर झालीच, शिवाय समाजसेवेचा एक सशक्त संदेशही पाटोदा परिसरात पोहोचवण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पाटोद्यात मोठ्या उत्साहात साजरा






















