गोपीनाथ मुंडे; लातूरचे राजकरण,राजकीय योगदान ;

एक कटाक्ष !

काल लातूर जिल्हा परिषदेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.आणि यावेळी उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला असलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन केले.अर्थात 1999 ला नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाडत देशमुख – मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय उदय केला होता,त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या विलासराव देशमुख यांच्या पुतळा अभिवादनाला ती किनार द्यावी लागेल.असो,पण कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे आणि लातूरचे राजकरण यावर कटाक्ष टाकणे अत्यंत गरजेचे असल्याने यानिमित्ताने इतिहास खंगाळण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
एकमेकांची राजकीय सोय हाच एकमेव समांतर धागा विलासराव देशमुख – गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा होता.आणि या राजकीय सोयीत देवेंद्र फडणवीस यांचा देखील बऱ्याच अंशी राजकीय लाभ झाला.आणि त्याचमुळे फडणवीस काल मुंडेंच्या पुतळ्याच्या अनावरणाला आले,आणि विलासराव देशमुख यांना देखील अभिवादन केले.मात्र याच गोपीनाथ मुंडे यांचा लातूरातील राजकीय प्रवास भाजपपेक्षा कॉंग्रेससाठी अधिक लाभदायक राहिला याची देखील उजळणी नक्कीच करावी लागेल,आणि त्यावरून मुंडे यांच्या व्यक्तीमत्वाची उंची किमान लातूरच्या पुरती मोजावी लागेल.आणी ते सर्व पाहता पुतळा लातूरमध्ये असावा का ? आणि असे काय योगदान लातूरच्या विकासासाठी आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.अर्थात सध्याच्या भावनिक व जातीय राजकारणात याचे उत्तर कोणीही देणार नाही.उलट शिव्या, आणि वैयक्तिक पातळीवर टीका करून समर्थक,लाभार्थी मोकळे होतील.लातूर जिल्हा परिषदेत मुंडे यांचा पुतळा उभा टाकला, मात्र ज्या बीड जिल्ह्यात मुंडेंचे राजकरण वाढले त्या बीडच्या जिल्हा परिषदेत मुंडे यांचा पुतळा आहे असे अद्याप तरी माझ्या ऐकिवात नाही.किंवा लातूर जिल्ह्यात मुंडेंच्या मालकीचा पन्नगेश्वर हा खाजगी साखर कारखाना आहे,तेथे देखील मुंडेंचा पुतळा असल्याचे आजपर्यंत दिसले नाही.परळी विधानसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील रेणापूरचा कांही भाग यायचा एवढाच काय तो मुंडेंचा आणि लातुरचा संबध.आणि त्या निवडणुकीत विलासराव देशमुख परळीतील देशमुखांना फोन करून मुंडेंना मदत करा म्हणायचे आणि टी पी मुंडे आणि तत्सम कमजोर उमेदवार काँग्रेसकडून द्यायचे.आज देखील बीडमधील काँग्रेस आणि लातूर मधील भाजप उबदऱ्या आली नाही या पापाचे सर्व श्रेय विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनाच जाते,अर्थात त्यांची पुढील पिढी तेच करतेय.व भाजपचे विद्यमान प्रदेश नेतृत्व देखील मुंडेंची परंपरा अधिक जोमाने किमान लातूरच्या पुरती तरी पुढे घेऊन जाते आहे.जसे विलासराव यांनी कमजोर उमेदवार मुंडेंच्या विरोधात दिले तसेच कमजोर उमेदवार मुंडेंनी लातुरात विलासराव देशमुख यांच्यासमोर दिले,मग ते विक्रम गोजमगुंडे असतील,शिवाजीराव कव्हेकर असतील तर कधी जागाच अस्तित्व नसलेल्या शिवसेनेला सोडली असा जाज्वल्य इतिहास आहे.बाकी विकासाचा तर लांब लांब पर्यंत विषय लातूरच्या बाबतीत मुंडेंचा नाही.अर्थात विलासराव देशमुख यांनीच लातूरचा खरा आणि मूलभूत विकास केला आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आ वासून उभा राहिलेला असताना मुंडेचा तर विषयच नाही.म्हणजे मला आज देखील आठवतंय की 1999 ला भाजप – सेना युती वापस राज्यात सत्तेवर येईल अशी परिस्थिती होती.थोडा बहोत फरक आमदारांचा होता.मुंडेंना अपक्ष आमदारांचा पाठीमागे होता,आणि त्या बळावर त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते,मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडेंना म्हणजेच भाजपला मुख्यमंत्री देण्यास स्पष्टपणे नकार दिला.त्यावेळी मुंडेंनी जवळपास 15 – 16 अपक्ष आमदार,जे मुंडेंच्या बाजूने होते ते आमदार विलासराव देशमुख यांच्याकडे वळवले.आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.अपक्ष आमदारांचे नेते हर्षवर्धन पाटील ,मुंडे आणि विलासराव असा प्रवास नजरेआड नक्कीच घालता येणार नाही.पुढे 2004 साली विलासराव देशमुख यांना शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर या दिग्गज काँग्रेस नेत्यांना पाडायचे होते म्हणून मुंडे – देशमुखांनी मिळून रुपाताई पाटील निलंगेकर यांना लोकसभा आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना निलंगा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देत पराभव केला.आणि मी आणि विलासरावानी मिळून तुम्हाला पाडले असे मुंडेंनी जाहीर भाषणात चाकूरकर यांच्या समक्ष मान्य केले होते तर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मला पाडण्यात लातूरची रसद होती असे जाहीर भाषणात बोलले होते.नक्की साल आठवत नाही,मात्र नितीन गडकरी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते.आणि त्यावेळी भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक लातूरला घेण्याची ठरली.हे विलासराव देशमुख यांना कळताच त्यांनी थेट मुंडेंना फोन करून माझ्या लातूरमध्ये बैठक कशाला,राज्याचे नेते येणार,माझ्या विरोधात बोलणार,राजकीय वातावरण ढवळून निघणार असे सांगत नाराजी व्यक्त करताच मुंडेंनी मला न विचारता लातूरला बैठक कशी ठेवली असा पवित्रा घेत अक्षरशः धिंगाणा घातला,परिणामी भाजपला लातूरला होणारी राज्य कार्यकारिणीची बैठक रद्द करावी लागली होती.2011 ला लातूर नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले.आणि 2012 ला निवडणुका झाल्या.त्या निवडणुकीत लातुरात प्रचाराला यायला लागू नये म्हणून मुंडेंनी डोळ्याचे ऑपरेशन करून घेतले.अर्थात 2017 पूर्वी लातूर महानगरपालिकेत भाजपचे अस्तित्व हे नसल्यासारखेच होते.आणि जे कांही होते ते उमेदवार फक्त भाजपचे होते.त्यांना निवडून विलासराव देशमुखच आणायचे.आज आमदार असलेले अभिमन्यू पवार यांना लातूर शहर भाजप अध्यक्ष करण्याची वेळ आली,त्यावेळी विलासराव देशमुख यांनी पवार नको अशी भूमिका घेतली, आणि अंतीम नाव झालेले असताना मुंडेंनी ऐनवेळी देविदास काळे यांना अध्यक्ष केले.अनेकदा लातूरचे भाजप नेते मुंडेंना भेटून,साहेब आम्हाला लातूरमध्ये राजकीय बळ मिळत नाही अशी तक्रार करायचे,त्यावेळी मुंडे सरळ म्हणायचे मला विलासराव विधानसभेत येथे मदत करतात,म्हणून मी राज्यात फिरू शकतो.तुम्हाला असे वाटतंय का मी राज्यात फिरू नये.तुमची कांही वयक्तिक कामे असतील तर ती घेऊन या मी करून देतो असे मुंडे स्पष्ट सांगायचे, मात्र लातुरात राजकीयदृष्ट्या भाजप सक्षम कधीही होऊ दिली नाही.2009 लोकसभा निवडणुकीत सुनील गायकवाड हे भाजपचे उमेदवार विलासराव देशमुख यांनी अंतिम केले.कारण विलासराव देशमुख यांनी जयंत आवळे या कोल्हापूर येथील नेत्याला लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.आणि ती निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची झाल्याने विलासराव देशमुख यांनी कमजोर उमेदवार म्हणून सुनील गायकवाड यांना पसंती दिली.मात्र ती निवडणूक बाहेरचा विरुद्ध स्थानिक अशी झाली, मुंडे – देशमुख यांनी प्रयत्न करून देखील त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती गेली.आणि शेवटी या दोघांनी मतमोजणीच्या वेळी निकाल फिरवला.मुंडेंनी कोणा कोणाला फोन केला हे सुनील गायकवाड सांगू शकतील.अशी अनेक उदाहरणे आहेत जी आणखीन समोर आली नाहीत.असा सर्व इतिहास असताना आज मुंडेचा पुतळा नेमके कशाचे प्रतीक आहे हा मुळात सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे.परत तेच जर भावनिक व जातीय अँगल दिला तर याचे उत्तर कधीही मिळणार नाही.मात्र कोठे तरी जे सत्य आणि वास्तव आहे ते मांडले पाहिजे की नाही याचा देखील विचार व्हायला हवा.अर्थात ते मान्य होईलच ही अपेक्षा शून्य आहे.मात्र हा पुतळा आणि तो देखील विलासराव देशमुख यांच्या बाजूला असणे हे नक्कीच लातूरच्या सामाजिक आणि राजकीय विकासाचे प्रतीक नाही हे मात्र नक्की.आता सत्ता आहे म्हणून आणि सत्तेसमोर शहाणपणा चालत नाही म्हणून कांहीही केले तर आमचे कांही होऊ शकत नाही ही मानसिकता बळावली असेल तर नाईलाज आहे.

जावेद शेख,
संपादक,बातमी मागची बातमी,लातूर.
मो.9158950000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *