*सरस्वती विद्यामंदिर लासलगाव येथे जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*

लासलगाव – सरस्वती विद्यामंदिर लासलगाव शाळेमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर हा पंधरवडा ‘जनजाती गौरव पंधरवडा’ म्हणून आदिवासी संस्कृतीवर आधारित विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या अंतर्गत आदिवासी लोककला आणि परंपरांची माहिती जमविणे ,वारली पेंटिंग प्रदर्शन ,आदिवासी संस्कृती आणि लोक जीवन प्रदर्शन ,आदिवासी नृत्य व कलाविष्कार ,भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी ओळख आदी उपक्रम आयोजित केले गेले.
या उपक्रमांची सांगता आज प्रत्यक्ष बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव शिंदे तसेच शिक्षकवृंद यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय नेत्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मनोगत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. प्रणाली भातोडे, दुर्वा शिंदे, ईश्वरी ठोंबरे, ओम आघाव या विद्यार्थ्यांनी प्रभावी शब्दांत आपले मनोगत व्यक्त करत बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्याची उजळणी केली.
कार्यक्रमामध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी लोक कलेवर आधारित सांस्कृतिक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ जिरे यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *