निफाड ( वार्ताहर )
निफाड येथील युवा संशोधक इंद्रजीत रतनलाल श्रीवास्तव यांना भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे मानाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जवाहरलाल नेहरू उन्नत वैज्ञानिक अनुसंधान केंद्र यांच्या वतीने देशातील निवडक संशोधकांना विज्ञानातील महत्त्वपूर्ण संशोधन कार्यासाठी SRFP शिष्यवृत्ती दिली जात असते. प्रा. इंद्रजीत श्रीवास्तव हे डॉक्टर साहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘थीन फिल्म ग्रोथ ऑफ सेमी कण्डक्टीग स्कँडीयम नायट्रॉइड ‘ या विषयावर सखोल संशोधन करीत आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर सी एन राव(डायरेक्टर of जवाहरलाल नेहरू रिसर्च सेंटर)यांच्या उपस्थितीत श्रीवास्तव यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातून फक्त पंचवीस शास्त्रज्ञांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली असून भौतिक शास्त्र विभागात देशातील पाच जणांची निवड झालेली असून महाराष्ट्रातून हा बहुमान मिळवणारे प्राध्यापक इंद्रजीत श्रीवास्तव हे एकमेव शास्त्रज्ञ आहेत. इंद्रजीत श्रीवास्तव हे निफाडचे रहिवासी असून वैनतेय विद्यालयातून त्यांनी बारावी विज्ञान शाखेपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. पुणे आणि बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल केलेली आहे. पुणे विद्यापीठात ते सुवर्णपदकाचे मानकरी देखील ठरलेले आहेत. प्रा. श्रीवास्तव यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


























