पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व नैसर्गिक हानी झाली आहे. शेतामध्ये पाणीच पाणी साचल्याने उभे पिके सडून हातची गेल्यात जमा झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अमळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते भाऊसाहेब आण्णा भवर यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात कुसळब, पिंपळवंडी, सुप्पा,वाहली चिखली, चिंचोली, सावरगाव घाट, सौताडा, घुलेवाडी, भुरेवाडी,मुगगाव, चिखली, चिंचोली,अंतापूर,निवडुंगा आदी गावांमध्ये पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांचे अक्षरशः तलाव झाले असून, पिके सडून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे नेते भाऊसाहेब भवर यांनी सांगितले की, अमळनेर सर्कल परिसरातील शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे उभ्या पिकांचे झालेले प्रचंड नुकसान हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण करणारा आहे. एकमेव उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने शेतकरी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी तातडीने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन भाऊसाहेब भवर यांनी प्रशासनाला केले आहे.
अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावा – भाऊसाहेब भवर






















