सुरगाणा (प्रतिनिधी) – केअर रिचर्स फाउंडेशनच्या विद्यादान उपक्रमांतर्गत आणि आदर्श युवा मंडळाच्या सहकार्याने सुरगाणा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत चिकाडी, पिळुकपाडा, साबरदरा, वाजुळपाणी, भरडमाळ, माळेगाव, थविलपाडा आणि पंगारबारी या जिल्हा परिषद शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक वसंत राठोड यांनी सांगितले की, “विद्यादान उपक्रमाअंतर्गत दरवर्षी सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. शिक्षण हे मूलभूत हक्क असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी हा आमचा हेतू आहे.”
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उमेद निर्माण झाली असून, शाळांच्या मुख्याध्यापकांनीही या मदतीचे स्वागत करत फाउंडेशनचे आभार मानले.






















