पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा नगरपंचायत हद्दीतील हुतात्मा स्मारकाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी नगर पंचायतने सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली, शौचालय, पेव्हिंग ब्लॉक व लँडस्केपिंगची कामे भामेश्वर इन्फ्रा प्रा. लि. या गुत्तेदारास दिली होती. परंतु निविदा व करारनाम्यात स्पष्ट अटी असतानाही आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.काम सुरू न झाल्याने स्मारक परिसरात कचरा, बांधकामाचे अवशेष, तसेच जनावरांचा वावर वाढला आहे. या दुर्दशेमुळे परिसराचे पावित्र्य हरवले असून, हुतात्म्यांचा अपमान होत असल्याची भावना नागरिकांमध्ये प्रबळ झाली असून हे काम न करता मुद्दाम विलंब करत असून “काम न करता फक्त कागदोपत्री दाखवून बिले वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट प्रशासनाने गुत्तेदारावरच मेहरबानी दाखवल्याचा आरोप होत असून तात्काळ कारवाई झाली नाही तर सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.स्मारकाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा उभारू, असा इशारा दिला आहे.
हुतात्मा स्मारकाचे काम रखडले गुत्तेदारावर प्रशासन मेहरबान; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा






















