पोळा सण: बैलांच्या ऋणानुबंधांचा कृतज्ञतेचा महोत्सव

 

भारतीय संस्कृतीत सण हे केवळ आनंदाचे निमित्त नसतात , तर ते आपल्या जीवनशैलीशी , निसर्गाशी आणि संस्कृतीशी असलेल्या नात्यांची जाणीव करून देतात . अशा अनेक सणांपैकी पोळा हा एक असा सण आहे, जो आपल्या कृषीसंस्कृतीतील बैल या अत्यंत महत्त्वाच्या जीवावर केंद्रित आहे . पोळा म्हणजेच बैलपोळा — श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्येला साजरा होणारा सण — हा शेतकरी आणि बैल यांच्यातील ऋणानुबंधाचे प्रतिक आहे . वर्षभर न थकता शेतकऱ्याच्या शेतीसाठी राबणाऱ्या बैलांना कृतज्ञतेने नमविण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस असतो .
भारतात पोळा महाराष्ट्र , मध्य प्रदेश , छत्तीसगड , कर्नाटक या राज्यांत साजरा केला जातो . महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ , मराठवाडा आणि खान्देश भागात या सणाला मोठं महत्त्व आहे. या दिवशी बैलांना आंघोळ घालून , त्यांच्या अंगाला हळद , तेल लावून, रंगीत रंगांनी सजवले जाते . गळ्यात माळा , घंटा , कवड्या , आणि पायात चांदीचे तोडे घातले जातात . शिंगांना रंग लावून ते उठून दिसतील अशी सजावट केली जाते . बैलांना जेवायला गोडधोड अन्न दिलं जात . संध्याकाळी गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते . शेतकरी पारंपरिक वेशात , ढोल-ताशा , बॅन्ड , लेझीम यांच्या गजरात आपल्या बैलांसह सामील होतात . या मिरवणुकीत बैलांच्या सौंदर्यस्पर्धाही घेतल्या जातात .
पोळ्याच्या आदल्या दिवसापासूनच तयारी सुरू होते . शेतकरी बैलांची साधने जसे की जू , सोंटा , नांगर झाडून-पुसून रंगवतात . महिलावर्ग घरातील सजावट करतो . विशेष पारंपरिक जेवण बनवलं जात , ज्यात पुरणपोळी , कांदाभजी , खिचडी , शेवया इत्यादी पदार्थ असतात . मुलांसाठी हा दिवस खास असतो — कारण अनेक घरांत लहान मुलांना लाकडी बैलाचे खेळणे दिले जाते . ‘ तन्हा पोळा ’ म्हणून दुसऱ्या दिवशी मुले हे खेळणे सजवून गावभर घेऊन फिरतात . पोळा सणाचे पुराणकाळापासून महत्त्व आहे . श्रीकृष्णाच्या गवळणारी जीवनशैलीत गोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे . बैल हे केवळ शेतीचे सहकारी नव्हे, तर ते जीवनशैलीचे अविभाज्य घटक होते . त्यामुळे पोळा हा फक्त सण नसून , एक प्रकारचा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सांस्कृतिक दिन आहे . पूर्वीच्या काळी यंत्रांचा अभाव होता , तेव्हा शेतीतील सर्व कामं बैलांवर अवलंबून होती . नांगरणीपासून वाहतुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बैलांचे योगदान अमूल्य होते . आजही काही भागांत ते तितक्याच श्रद्धेने वापरले जातात .
सणाच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि विशेष मंत्र म्हणत बैलाला ओवाळले जाते . ‘बैल माझा चांगला , मळ्यात नांगरतो ; पोळ्याला येता , माझं मन हरखतो ! ’ अशा ओव्या गात गात बायका त्यांच्या कृतज्ञतेचे शब्द व्यक्त करतात . बैलांच्या गळ्यात लावलेल्या घंटा , पायातील तोडे , आणि मिरवणुकीतील ढोल-ताशांचे आवाज संपूर्ण गावात सणाचा आनंद निर्माण करतात . लोक एकमेकांच्या घरी जातात , एकत्र जेवतात , आणि बैलांच्या गोष्टी सांगतात . पोळा सण गावकरी , शेतकरी , महिला , आणि लहानग्यांना एकत्र आणणारा सण आहे .
आधी बैलांना स्नान घालणे , नैसर्गिक रंगांनी सजवणे , त्यांना विश्रांती व चांगले जेवण देणे यावर भर होता . पण आता काही ठिकाणी डीजे , लाऊडस्पीकर , नाच-गाणी , रासायनिक रंग, प्लास्टिक सजावट यामुळे सणाचा मूळ हेतू हरवतो आहे . तसेच शेतीत ट्रॅक्टर , यंत्रसामग्री वाढल्यामुळे बैलांचे महत्त्व कमी झाले आहे . त्यासाठी आपण प्रयत्न व उपाययोजना करायला हव्या जसे की बैलपोळा सण पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा . बैलांच्या सजावटीसाठी नैसर्गिक रंग व साहित्य वापरावे .
मुलांना व तरुण पिढीला सणाचे खरे महत्त्व समजावून सांगावे . गावात सांस्कृतिक कार्यक्रम , पोवाडे , शेतकऱ्यांच्या कथा सांगून परंपरा जपावी . बैलपोळा सणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी परंपरा , पर्यावरण आणि संस्कृती यांचा सन्मान राखून सण साजरा करणे गरजेचे आहे .
आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात पोळ्याचे महत्त्व काहीसे बदलले असले तरीही या सणाचे संस्कृतीशील मूल्य टिकवले गेले आहे . शहरी भागातही शाळांमधून लाकडी बैल , चित्रकला स्पर्धा, ओवी गायन , प्रात्यक्षिके , आणि पर्यावरणपूरक बैल बनवण्याचे उपक्रम राबवले जातात . सोशल मिडियावरून माहिती दिली जाते . काही ठिकाणी ‘इको-फ्रेंडली पोळा’ साजरा केला जातो . या सणाद्वारे आपण निसर्ग , प्राणी , आणि शेती या तीनही घटकांना एकत्र बांधून ठेवणारा धागा जपतो . पोळा सण म्हणजे शेतकऱ्याचे आपल्या कामाच्या जोडीदाराबद्दलची कृतज्ञता , प्रेम , आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस . तो केवळ बैलांचा सण नाही , तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे . म्हणूनच हा सण साजरा करताना प्रत्येकाने बैलांप्रती प्रेम , जपणूक आणि सन्मान जपावा . आजच्या पिढीनेही या सणाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, कारण ही आपली माती , आपली संस्कृती आणि आपली ओळख आहे .
आपल्या बैलपोळा सणाची संस्कृती जतन करण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे :
१. पारंपरिक पद्धती जपणे : बैलांना रंग , फुले , गोंडे लावताना नैसर्गिक व सुरक्षित वस्तूंचा वापर करावा . बैलांना सजवताना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी .
२. पिढ्यान् पिढ्या संस्कार देणे : लहान मुलांना बैलाचे महत्व , शेतकऱ्याचे श्रम व बैलपोळ्याची परंपरा याबद्दल सांगावे . शाळा , महाविद्यालयांमध्ये बैलपोळा विषयावर निबंध, नाटिका, चित्रकला स्पर्धा घेता येतात .
३. समाजातील सहभाग वाढवणे : गावागावांत बैलांची मिरवणूक , पारंपरिक खेळ व पोवाडे आयोजित करावेत . गावातील सर्वजण मिळून सण साजरा केल्यास एकतेची भावना वाढते .
४. आधुनिकतेसोबत जोडणे : मोबाईल , सोशल मीडियावरून बैलपोळ्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावे . गावाची परंपरा दाखवणारे व्हिडिओ , माहितीपट तयार करून जतन करावेत .
बैलपोळा संस्कृती जतन करण्यासाठी परंपरा , शिक्षण , समाजसहभाग , आधुनिक माध्यमे आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांचा योग्य संगम करणे गरजेचे आहे .

चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके ,
तहसीलदार , बीड

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *