: मारहाण असमर्थनीयच ; पण अजित पवार,कोकाटेंना शिव्या ; चव्हाणांच्या अंगावर चहा समर्थनीय कसे ?

लातूर सुरज चव्हाणांच्या असंविधानीक भाषेच्या आरोपाकडे सोयीस्कर दुर्लक्ष !

जावेद शेख
लातूर दि – राजकारणासाठी कांहीही हे चित्र सध्या सबंध राज्यात प्रकर्षाने दिसते आहे.त्यामुळे शेतकरी, युवक यांच्या प्रश्नांचे कोणालाही घेणे देणे नाही.प्रत्येकाला आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवायची आहे.आणि कांही अंगलट आले की तो विषय जातीकडे घेऊन गेला की सगळ माफ,आणि जात म्हणजे सर्वस्वी अशीच प्रथा राज्यात सध्या पडली आहे.अर्थात हे उघड कोणीच बोलत नाही,कारण उघड बोलले की मतांचे आणि जातीय राजकारण आडवे येते,आणि यापेक्षा पुढे जाऊन तो महाराष्ट्रद्रोह ठरतो अशी दुर्दैवी परिस्थिती आज झाली आहे.आणि यातून शांत आणि सुसंस्कृत लातूर देखील सुटलेले नाही.त्यामुळे लातूरमध्ये देखील अश्या घटना आज सर्रास घडत आहेत,ज्यातुन लातूर बदनाम तर होतेच आहे,शिवाय शांत आणि सुसंस्कृत लातूर ही प्रतिमा देखील आज पुसली जाते आहे.नुकतेच भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी अमित देशमुख यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालून राज्यात लातूरची बदनामी केल्याचे प्रकरण ताजे असताना लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याने आणखीन त्यात भरच पडली आहे,ज्यातून लातूर सध्या चर्चत आले आहे.नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी केलेली मारहाण असमर्थनीयच आहे,अर्थात सुनील तटकरे, अजित पवार व दस्तुरखुद्द सुरज चव्हाण यांनी देखील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीच आहे.यापुढे जाऊन सुरज चव्हाण या अल्पसंख्याक नेत्याचा राजकीय बळी देखील यात गेला आहे.मात्र मारहाण असमर्थनीयच असताना मारहाण ज्या कारणांमुळे झाली ती बाजू समोर येत नाहीये,किंवा सोयीस्कर जातीय रंग या घटनेला आल्याने बाजूला केली जाते आहे,दुर्लक्षित केली जाते आहे,आणि दबावतंत्रात कांहीही सुरू आहे.जर मारहाण असमर्थनीय आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिव्या देणे व शिव्या का दिल्या विचारण्यास गेलेले असताना सुरज चव्हाण यांच्या अंगावर चहा टाकणे हे समर्थनीय कसे ? आणि घटनेच्या या अँगलची चर्चा कोठेच का नाही हा मूळ सवाल आहे.अगदी सुरज चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत छावाच्या लोकांनी असंविधानीक भाषेचा वापर केला,खालच्या पातळीवर जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी अपशब्द काढले असे सांगत असताना देखील त्यावर कोणीच का बोलत नाही,पोलीस हा अँगल का पाहत नाहीत ही सुद्धा बाब विचार करण्यासारखीच आहे.कोणाला शेतकऱ्याचा किती कळवळा आहे,कोणाचे किती आणि कोणासाठी योगदान आहे,कोणाचा काय इतिहास आहे,कोणाला कोणाचे पाठबळ आहे हा भाग तर फारच अलाहिदा.अर्थात जनतेला सर्वस्वी महिती आहे,फक्त कोणी या घाण वातावरणात बोलत नाही एवढाच काय तो विषय.आणि या घटनेचा सार काढला तर ऍक्शनची रिऍक्शन असा सरळ सरळ अर्थ असताना,दुसरी बाजू दुर्लक्षित करून लातूर बंद कशामुळे ? म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय याचे मंथन आपला राजकीय, जातीय स्वार्थ बाजूला ठेवून सर्वानी विचार करण्याची गरज आहे.अमुक या जातीचा आहे किंवा या जातीचा नाही म्हणून जर कारवाईचे निकष ठरणार असतील,आंदोलनाची दिशा ठरणार असेल,लातूर बंद होणार असेल तर ही मुळात लातूरची संस्कृती नाही हे आज संस्कृतीचे डोस पाजत सुटलेल्या मंडळींनी विचारात घेण्याची गरज आहे.
लातूरच्या विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आले असता छावा या संघटनेच्या लोकांनी सुनील तटकरे यांना निवेदन दिले.दिल्यानंतर तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकले.अर्थात त्याला किनार होती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी गेम आपल्या मोबाईलवर खेळल्याची.पत्ते समोर टाकणे हे कितपत योग्य,ते लोकशाहीला धरून आहे का ? हा भाग अलाहिदा.मात्र तरीही तटकरे यांनी शांतपणे निवेदन घेतले व एका शब्दाने देखील प्रतिक्रिया दिली नाही.आणि यानंतर थेट बातमी बाहेर अशी आली की लोकशाही मार्गाने निवेदन दिले म्हणून,अंगावर पत्ते टाकले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी मारहाण केली. मात्र निवेदन देणे ते मारहाण या दोन घटनेच्या मधील वेळेत काय झाले हे कोणीच बोलायला तयार नाही,समोर आणायला तयार नाही.अर्थात सत्ताधारी पक्षाचा युवकाचा प्रदेशाध्यक्ष ज्यावेळी एवढे शेवटचे पाऊल उचलतो,त्यावेळी नक्कीच त्याला कांही तरी कारण असणार.तरी या घटनेला ठरवून वेगळे रूप अर्थात जातीय रूप दिले गेले हे मागील दोन दिवसात खूप प्रकर्षाने एकंदरीत घटना पाहता जाणवले.लातूर बंदला देखील तीच किनार हे वेगळे सांगायला नको.मिळालेल्या माहितीनुसार आणि लातुरात सुरू असलेल्या चर्चेनुसार ज्यावेळी छावाचे लोक तटकरे यांना निवेदन देऊन निघाले, त्यावेळी घोषणा दिल्या गेल्या,आणि त्या घोषणेत अजित पवार,माणिकराव कोकाटे यांना शिव्या दिल्या गेल्या.ही बाब सुरज चव्हाण यांना सांगण्यात आल्यानंतर सुरज चव्हाण यांनी विश्रामगृहावर ज्याठिकाणी छावाचे लोक बसले तेथे जाऊन विचारणा केली असता तेथे सुरज चव्हाण यांच्या अंगावर चहा फेकण्यात आला,आणि तेथून मारहाणीची घटना घडली.मात्र घटनेचा हा अँगल चर्चिला जात नाही.दखल घेतली जात नाही.आणि चक्क निषेध म्हणून लातूर बंद ही कसली मानसिकता ? यात लातूरच्या जनतेचा काय संबंध ? आणि जनतेने यात का फरफटत जायचे ? अर्थात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत विधान करत योग्य प्रतिक्रिया दिलीच होती.अगदी ही घटना घडल्यानंतर सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया आली,ज्यात सुरज चव्हाण यांनी सांगितले की,घोषणा देत असताना छावाच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर असंविधानीक भाषेचा वापर करत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द काढले.त्यांनी शिव्या दिल्या हा शब्द फक्त वापरला नाही,मात्र असंविधानीक भाषा,खालच्या पातळीवर जाऊन भाषा म्हंटले असताना त्याची साधी दखल होऊ नये हे मूळात घातक आहे.मात्र या प्रतिक्रिया आणि सुरज चव्हाण यांच्या अंगावर चहा टाकणे ही बाबच या घटनेत कोणीही अगदी पोलीस देखील पाहायला तयार नाहीत.गुन्हा दाखल करत असताना दुसरी बाजू का पहिली जात नाहीये.उलट ही मारहाण होत असताना जे लोक प्रत्यक्षदर्शनी नव्हते असे लातुर आणि देवणी येथील जवळपास तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे ही घटना ऍक्शनची रिऍक्शन असताना पोलीस फक्त रिऍक्शन पाहत आहेत,ऍक्शनचा विचारच होत नाहीये.सुरज चव्हाण हे अजित पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात,व ते मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील असून, रजपूत समाजातून येतात,व मागील काळात लातूर जिल्ह्यात विशेषतः निलंगा विधानसभा मतदारसंघात त्यांनी अजित पवार यांच्याकडून थेट अनेक विकासकामे केली आहेत.
व पक्षात त्यांचे वाढते प्रस्थ पाहता या घटनेत स्थानिक ते राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळीनी देखील सुरज चव्हाण कसे अडचणीत येतील याची पुरेपूर खबरदारी घेतली. व ही घटना घडत असताना बाहेरून आतमध्ये मारहाण करण्यास पाठवणे व आतमध्ये जाऊन मीच कसा भांडणे सोडवतो हे दाखवण्याचा कांहीजणांनी प्रयत्न देखील केला.सोबतच कांही दिवसापूर्वी सुरज चव्हाण यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतल्याने कांही जणांनी ती देखील बाजू आणत आपली भडास काढून घेतली.अगदी ही लातूरची संस्कृती नाही असे सांगत सुटले. जेंव्हा की लातूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना दिवसाढवळ्या कोणी मारहाण केली ? ज्यांनी मारहाण केली तेच लोक संस्कृतीचे डोस पाजत होते. त्यावेळी लातूरची संस्कृती कोणाच्या गढीवर बांधली होती काय माहिती ? आणि लातूर बंद करत असताना या घटनेला जातीय स्वरूप देणे ही लातूरची संस्कृती आहे का ? याचा देखील विसर साफ पडतो.या प्रकरणात थेट मराठा विरुद्ध ओबीसी याचे रूप दिले ही लातूरची संस्कृती आहे का ? आणि थेट संवैधानिक पदावर असलेल्या अजित पवार यांना शिव्या देणे ही लातूरची संस्कृती आहे का ? या देखील बाजू तटस्थपणे जातीच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे.मात्र सध्या जात म्हणजे सर्वस्वी झाली असल्याने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे हे मूळात लातूरच्या संस्कृतीला घातक आहे हे समजून घेण्याची व चुकीला चूक म्हणायची गरज आहे,तरच लातूरची संस्कृती अबाधित असणार आहे. अन्यतः आगामी काळात रस्त्यावर खून पडले तर मुळीच नवल वाटायला नको.आणि लातुरच्या विश्रामगृहात जे घडले त्याला देखील हीच किनार आहे हे वेगळे सांगायला नकोच.
: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
.ना.श्री अजित दादा पवार साहेब*
यांच्या वाढदिवसानिमित्त
दिनांक 23 जुलै 2025
वार मंगळवार रोजी
राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा मधुमती ताई कनशैट्टै यांच्या वतीने उदगीर शहरातील पोलिस काॅटर येथे वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी उपस्थित प्रदेश संघटक भरत चामले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ,पीएसआय सुधाकर केंद्रे उपविभागीय कार्यालय उदगीर, पीएसआय शिवाजी केंद्रे, माजी नगरसेवक अनिल मूदाळे, माजी नगरसेवक शेख फैय्याज, माजी नगरसेवक ईमरोज हाशमी, प्रदेश सचिव इम्तियाज शेख, नवनाथ गायकवाड, महिला प्रदेश सरचिटणीस रविप्रभाताई खादीवाले, महिला जिल्हा कार्याध्यक्षा दिपाली ताई ओटे,महिला तालुका अध्यक्ष उर्मिला ताई वाघमारे,युवक शहर अध्यक्ष गिरीश उप्परबावडे,शहर कार्याध्यक्ष आजम पटेल, संघशक्ती बलांडे,बाळु सगर, आशा ताई रेड्डी,हुस्ना बानो आपा, महिला शहर कार्याध्यक्षा वैशाली ताई कांबळे, राजकुमार गंडारे पोलीस जमादार राहुल गायकवाड पोलीस जमादार गेडाम महिला पोलीस जमादार हेमा घोरपडे , पोलीस जमादार माणिक मस्के, अविनाश गायकवाड, युसुफ बागवान,विश्नुकांत वागलगावे व उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *