स्वतःच्या अस्तित्वाचे स्वामी बना : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

पुणे:आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अंतगडसूत्राची फार गरज आहे. स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःचं नशीब कसं घडवता येईल याचे सूत्र या अंतगडसूत्रात सांगितलेले आहे. म्हणजेच अंतगड सूत्रामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचे स्वामी कसे बनू शकता याचेही सूत्र आहे. नियतीने जी परिस्थिती समोर आहे मांडून ठेवली आहे, तिला तसेच शरण न जाता त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. स्वतःचं कर्म स्वतःच्या हातानेच बदलता आलं पाहिजे असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले. प्रवीणऋषीजी म.सा पुढे म्हणाले, ज्याची उत्पत्ती झाली आहे त्याचा कधी ना कधी लय हा होणारच, हा जगाचा पहिला सिद्धांत आहे. पण अस्तित्व ही एकमेव अशी गोष्ट आहे जी पुसण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती पुसली जाणार नाही. तसेच कोणतीही घटना घडते ती घटना घडण्यामागे कोणते ना कोणते ‘कारण’ असतेच. हा जगाचा दुसरा सिद्धांत आहे. घटना का घडली? ह्याचे कारण शोधताना ते तुम्ही कशा पद्धतीने शोधता यावरही तुमचं अस्तित्व ठरत असतं. म्हणजेच या दोन्ही नियमांमध्ये अस्तित्व ही गोष्ट पणाला लागत असते. घटना घडण्याआधीच जे घटनेमागील जे कारण आहे ते ओळखून त्या कारणावर विचारपूर्वक काम केले, ते सुधारण्याचा, बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून घडून येणारा परिणाम हा नक्कीच वेगळा किंवा बदलेला असेल. त्यामुळे कोणतेही कार्य अथवा क्रिया करण्याआधी त्या मागचं कारण शोधून त्यावर काम करायला हवे. तसेच आयुष्यात येणारी दुःख, समस्या याबाबतीतही असाच नियम लागू पडतो.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, समस्येचे समाधान कसं शोधता यावरच आपली प्रतिमा घडत असते. कोणताही हेतू मनाशी बाळगाळ तो अगदी मनापासून बाळगला तर तो नक्कीच पूर्ण होतो. मात्र त्यामागे तुमची इच्छाशक्ती ही तितकीच दांडगी असायला हवी. समजा तुम्ही सुखी आनंदी राहिला तर जीवनात आनंदच भरून राहील. पण जर उराशी दुःख, समस्या बाळगल्यात तर पदरी दुःख आणि निराशाच येईलं. यासाठी आपण मनाशी केलेली धारणा कोणत्या विचारांची आहे याकडे फार बारकाईने लक्ष द्यायला हवे. खूपदा आपल्यासमोर जे नाही तेच आपण पाहतो. म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही अशा गोष्टींचा आपण विचार करत राहतो. आपल्या मनाचे खेळ खेळत राहतो. त्यातून फक्त समस्याच उद्भवत राहतात. ही समस्या आपण कशा पद्धतीने सोडवतोय यालाही फार महत्त्व आहे. समस्येचे निराकरण करताना ते अविचारी, अविवेकाने, रागाने की शांततेने, संयमाने सोडवतोय याकडेही उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं. यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाला विचलित होऊन द्यायचं नाही. समस्येचे समाधान शोधताना ते संयमाने, शांततापूर्ण, विचारपूर्वक शोधले गेले तरच स्वतःच्या अस्तित्वावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. एकदा का असं नियंत्रण मिळवले की कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो. त्यातून योग्य मार्ग काढू शकतो. अशावेळी सगळे रस्ते जरी बंद झाले असले तरी तुम्ही घेतलेल्या विचारपूर्वक निर्णयातून तुम्ही तुमच्या मार्गाला राजमार्ग बनवू शकता आणि हाच तुमच्या संयमी अस्तित्वाचा दाखला असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *