वीर जवान किशोर ठोके यांच्या पत्नीस देवळा येथील पतसंस्थेकडून ५० हजारांची मदत

 

चांदवड (कीर्ती गुजराथी) –
पाटे ता. चांदवड येथील भूमीपूत्र, भारतीय सैन्यदलातील जवान किशोर ठोके यांना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमेवर कार्यरत असताना चार दिवसांपूर्वी वीरमरण आले होते. त्यांच्या वारस वीरपत्नी वैशाली ठोके यांना देवळा येथील सुराणा पतसंस्थेकडून ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेचा धनादेश पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप सुराणा, उपाध्यक्ष संजय कानडे, संस्थापक अध्यक्ष रमणलाल सुराणा, अशोक गोळेचा, जनार्दन शिवदे, प्रविण सुराणा, सुनील बुरड यांच्या उपस्थितीत वीरपत्नी वैशाली यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी त्यांनी वीरपत्नी वैशाली यांचे सांत्वन केले. देवळा येथील सुराणा पतसंस्थेमार्फत गेल्या २० वर्षांपासून जिल्ह्यातील शहीद जवानाच्या वारसांना ५० हजारांची मदत देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे दोन हजार पतसंस्था आहेत. या सर्व पतसंस्थांनी जिल्ह्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ हजारांची मदत केली तरी सुमारे एक कोटी रुपये शहीद कुटुंबीयांना मदतीचा हात मिळू शकेल, त्यामुळे पतसंस्थांनी सदर मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक रमणलाल सुराणा यांनी केले आहे. यावेळी जगन ठोके, शिवराम ठोके, पंकज ठोके व वीरमाता आदी उपस्थित होते.
————–
फोटो- पाटे येथील वीरजवान किशोर ठोके यांच्या वीरपत्नी वैशाली यांच्याकडे ५० हजारांच्या मदतीचा धनादेश देताना देवळा येथील सुराणा पतसंस्थेचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *