लासलगाव (आसिफ पठाण)
महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अपायकारक ठरवून प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखू,गुटखा आणि जर्दा याचा मोठा साठा लासलगाव पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५२,५९०/- रुपये इतकी आहे.
लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप डगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,ही कारवाई करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,लासलगाव येथील सोहन नगर परिसरात असलेल्या शैलेश नंदकुमार बागमार याच्या गाळ्यावर पोलिसांनी छापा टाकला.शैलेश बागमार याचे वय अंदाजे २१ वर्षे असून तो साईनगर,लासलगाव येथे राहतो.
या छाप्यात आरोपी शैलेश बागमार याच्या ताब्यात असलेल्या पाच पांढऱ्या रंगाच्या गोण्या मध्ये विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू आणि जर्दा गुटखा यांचा मोठा साठा आढळून आला.यामध्ये डायरेक्टर सुगंधीत पान मसाला ९,७२०/- रुपये किंमतीचा,गोवा पान मसाला १८,०००/- रुपये किंमतीचा,शॉट ९९९ तंबाखू १८,३६०/- रुपये किंमतीचा,जी १ जर्दा ३,६६०/- रुपये किंमतीचा आणि झेड. एन. ०१ जाफरानी जर्दा २,८५०/- रुपये किंमतीचा,असा एकूण ५२,५९०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी शैलेश बागमार याने हा प्रतिबंधित आणि मानवी आरोग्यास हानीकारक असलेला साठा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या कब्जात बाळगल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळुंके हे करीत आहेत.


























