चांदवड (कीर्ती गुजराथी)
चांदवड तालुयासह नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुयातील श्रीक्षेत्र दत्ताचे शिंगवे येथील एकमुखी श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव सोहळ्यास गुरुवारपासून (दि. ४) प्रारंभ होत आहे. यानिमित्त दि. ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तप्रभू जन्मोत्सव व यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती श्री दत्त मंदिर ट्रस्टचे पुजारी प्रा. कृष्णा शेवलेकर व ट्रस्ट पदाधिकार्यांनी दिली.
महानुभाव पंथीयांचे आराध्य दैवत व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या माहूर स्थापनानंतर तालुयातील दत्ताचे शिंगवे येथील गडावरील दत्त मंदिर स्थानाला विशेष महत्व आहे. शिंगवे येथील दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी तीन दिवस नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून व इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथे हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी असते. यानिमित्त बुधवारी (दि. ३) शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याहस्ते श्री दत्तमूर्तीस मंगलस्नान, नविन वस्त्र समर्पण, गंधअक्षदा, पुष्पहार, विडा करण्यात येईल. उपहार दाखविला जाईल व महाआरती होऊन या यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मध्यरात्री जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. यावेळी जन्मस्नान होईल. गुरुवारी (दि. ४) दुपारी ३ वाजता पालखी सोहळा होणार आहे. शिंगवे नगरीतून श्रींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. शुक्रवारी (दि. ५) टांगा शर्यत व शनिवार दि. ६ रोजी कुस्त्यांच्या दंगलीनंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
यावर्षी श्री दत्त जयंती व पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज असून त्या दृष्टीने ट्रस्टने विशेष नियोजन केले आहे. संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत केले आहे. मंदिर आकर्षक फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. यात्रोत्सवात पूजा, विडावसर, साहित्याची दुकाने, प्रसाद, पुष्पहार, खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात येतात. ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी बॅरीकेटस्, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र दर्शन रांग, सीसीटीव्ही, वाहन पार्कींग आदी सुविधा देण्यात येणार आहेत. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी, श्री दत्त मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.
——
फोटो- १) शिंगवे येथील श्री दत्तप्रभूंची मूर्ती.
२) शिंगवे येथील गडावरील प्रसिद्ध श्री दत्तप्रभूंचे मंदिर.
जागतिक एड्स दिन दिनानानिमित्त चांदवड येथील होमिओपॅथी महाविद्यालयात प्रतिबंधात्मक उपाय जनजागृतीपर प्रबोधन पथनाट्य


























