मतदार यादीवर तब्बल ५ हजार ४०१ हरकती; प्रभागनिहाय यादीतील चुकांनी उडाला गोंधळ

 

पुणे – पिंपरी – चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर प्रचंड हरकती व आक्षेप नोंदविले जात असून, यादीतील मोठ्या प्रमाणातील चुका उघडकीस येत आहेत. २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दिसून येणे, काही प्रभागातील तर यादी भागच दुसऱ्या प्रभागात समाविष्ट होणे, माजी नगरसेवकांची नावे वगळली जाणे, तसेच दुबार नोंदी असे अनेक त्रुटींचे मोठे प्रमाण आढळून आले आहे.

शनिवारी (दि. २९) एका दिवसात तब्बल ४५६ हरकती दाखल झाल्या असून, आजवर एकूण ५,४०१ हरकती, सूचना आणि आक्षेप प्राप्त झाले आहेत. राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांकडून या त्रुटींवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत मिळालेल्या हरकतांची स्थिती पुढीलप्रमाणे:

क क्षेत्रीय कार्यालय : १,३६३ हरकती (सर्वाधिक)

अ क्षेत्रीय कार्यालय : १,२६३

ग क्षेत्रीय कार्यालय : ७६८

फ क्षेत्रीय कार्यालय : ६३१

ह क्षेत्रीय कार्यालय : ५२३

ड क्षेत्रीय कार्यालय : ३४०

व क्षेत्रीय कार्यालय : ३०४

ई क्षेत्रीय कार्यालय : १३८

दुबार नावे नोंदविल्याच्या १५ तक्रारींची नोंद झाली असून, त्यापैकी ग क्षेत्रीय कार्यालयात १४ तर अ क्षेत्रीय कार्यालयात १ तक्रार मिळाली आहे. महापालिका प्रशासनानेही सुमोटो ५६ हरकती दाखल करून घेतल्या आहेत.

प्रारूप मतदार यादीतील या व्यापक चुका कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बुधवार (दि. ३) पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नागरिकांनी चुकीची नोंद त्वरित दुरुस्त करून घेण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *