चांदवड (कीर्ती गुजराथी) –
चांदवड नगरपरिषद व चांदवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चांदवड शहरात नायलॉन मांजा जप्ती मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत १५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही दुकानदारांकडून नायलॉन मांजा व सिंगल युज प्लास्टीक बंदी अंतर्गत प्लास्टीक पतंग जप्त करण्यात आले.
या मोहिमेत मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस कॉस्टेबल विक्रम बस्ते, भूषण साळवे, स्वप्नील जाधव. नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे, विद्या साबळे, विजय शेजवळ, यशवंत बनकर, सुनिता शेजवळ आदी कर्मचारी सहभागी होते. चांदवड शहरात नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, असे स्पष्ट आवाहन मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी केले आहे. तसेच शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली आहे. नगरपरिषद, पोलीस प्रशासन व संबंधित विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे वेळोवेळी तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. नायलॉन मांजामुळे नागरिक, बालक, दुचाकीस्वार, पक्षी तसेच जनावरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असून अनेक अपघात व गंभीर दुखापतींच्या घटना समोर येत आहेत. हा धोका लक्षात घेता नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः बंद करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी सांगितले की, नायलॉन मांजावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली असून त्याची विक्री, साठवणूक तसेच वापर करणे हा गुन्हा आहे. तसेच कोणीही नागरिक नायलॉन मांजा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९६५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, काही ठिकाणी बेकायदेशीररित्या या मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. तसेच हा मांजा अत्यंत घातक असल्याने पक्ष्यांचे पंख कापले जाणे, त्यांचा मृत्यू होणे अशा हृदयद्रावक घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील नागरिक, दुकानदार, पतंग विक्रेते व पालक यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजाऐवजी केवळ सुताचा मांजा वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन नायलॉन मांजाचा वापर टाळावा, प्रशासनास सहकार्य करावे व कोणत्याही ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ नगरपरिषद किंवा पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
——
फोटो- चांदवड शहरात नायलॉन मांजा जप्ती मोहिमेंतर्गत १५ आस्थापनांची तपासणी करुन नायलॉन मांजा व प्लास्टीक पतंग जप्तीप्रसंगी मुख्याधिकारी दिनेश सिनारे, स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे, पोलीस हवालदार विक्रम बस्ते व नगरपरिषद कर्मचारी.

























