*समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे विचार समाजात रुजविण्याचे महत्वपूर्ण काम – माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह*
*देशातील ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम – माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह*
*महात्मा फुले यांच्याकडून शूद्र, अस्पृश्य, स्त्रिया यांच्या न्याय, उन्नतीसाठी महत्वपूर्ण कार्य – डॉ.सुखदेव थोरात*
*पुणे (आसिफ पठाण),:-* मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजविण्याचे महत्वपूर्ण काम करत आहे. त्यांचे विचार आजही समाजासाठी तितकेच प्रेरणादायी आहे. देशातील ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करतो आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना आज समता भूमी फुले वाडा, पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सन्मान पत्राचे वाचन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,प्रा.लक्ष्मण हाके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, सत्संग मुंडे, डॉ.स्नेहा सोनकाटे, डॉ. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ,डॉ. सुदर्शन घेरडे, यश बोरावके, मंजिरी धाडगे, प्रीतेश गवळी, पंढरीनाथ बनकर, महिला वैष्णवी सातव यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातील समता सैनिक उपस्थितीत होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह म्हणाले की, ते म्हणाले की सन २००६ पासून मंत्री छगन भुजबळ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेशी जोडलो गेलो. बिहार राज्यात ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मेळावे घेऊन ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला जात आहे. देशातील ओबीसी समाजासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा लढा सुरु असून त्यांचे योगदान हे अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींचे हे काम सुरूच राहील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पुरस्काराला उत्तर देतांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुखदेव थोरात म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी जातिव्यवस्था अस्पृश्यतेचे विश्लेषण करून थांबले नाहीत; तर त्यांनी शूद्र, अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या न्याय आणि उन्नतीसाठी प्रत्यक्ष कार्य केले. जातिभेद निर्मूलन , खालच्या जातीतल्या व्यक्ती आणि स्त्रियांना शिक्षण, सामाजिक राजकीय हक्क, एकेश्वरवाद, तर्कनिष्ठता या सर्व गोष्टींसाठी त्यांनी लढा दिला. महात्मा फुले यांनी शुद्र, दलित, स्त्रिया शेतकरी यांच्या प्रश्नांच्या स्वरूपाचे अध्ययन केले. त्याची जातिव्यवस्थेमध्ये असलेली कारणे शोधली.व त्यावर उपाय सुचविले व त्यांच्यामध्ये परिवर्तन आणण्याकरिता सामाजिक चळवळ उभी केली. त्याकरिता संस्था उभा केल्या व आपल्या हयातीत बदल घडवून आणले. त्यांच्या या कार्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी आपल्या संशोधनातून शुद्र, अतिशूद्र, दलित, स्त्रिया, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांची उकल केली. महात्मा फुले यांनी शोधून काढले की शूद्र आणि अतिशुद्रांचे शोषण जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेमुळे होते, कारण शूद्र आणि अतिशुद्रांना सर्व आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले गेले होते.त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून समानता, विज्ञानवाद आणि न्याय यांचा पुरस्कार केला. महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीने अनेक समाजसुधारक निर्माण केलेत. त्याला सामाजिक व राजकीय चळवळीना प्रोत्साहन दिले. ही परंपरा शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याचा गौरव करत सन २०१० च्या सुमारास नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते “Dalits in India: In Search of a Common Destiny” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असल्याच्या आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढले. त्यामुळे आज महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात विविध क्षेत्रात काम करतांना दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वाटचाल करत आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ हे लढा देत आहे. त्यांच्या माध्यमातून फुले वाडा व परिसराचा विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारे मंत्री छगन भुजबळ हे खरे शिलेदार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण वाटचाल करत आहोत. देशभरात ओबीसींना त्यांच्या हक्काचा वाटा मिळावा यासाठी लढा दिला जात आहे. आज ओबीसी विद्यार्थ्यांचे शिक्षणातून गळतीचे प्रमाण अधिक आहे. या विद्यार्थ्यांना जेव्हा लोकसंख्येच्या तुलनेत निधी उपलब्ध होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांना संधी मिळेल आणि त्यातून सामाजिक समता प्रस्तापित होईल असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करतांना आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, डॉ. थोरात यांच्या संशोधनाचा पाया हा सामाजिक न्याय व आर्थिक समता आहे. दलित-मागासवर्गीय समाजावरील आर्थिक भेदभाव, ग्रामीण विकास, कृषी अर्थशास्त्र, शिक्षणातील विषमता, गरिबी व सामाजिक बहिष्करण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक व सामाजिक विचारांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. त्यांचे कार्य केवळ शैक्षणिक पातळीपर्यंत मर्यादित नसून धोरणनिर्मात्यांना दिशा देणारे ठरले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची वाटचाल त्यांनी यावेळी मांडली.
*डॉ.सुखदेव थोरात यांचा परिचय -*
भारतीय सामाजिक-आर्थिक विचारविश्वात मोलाची छाप सोडणारे अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक, अभ्यासक आणि धोरणनिर्माते म्हणून डॉ. सुखदेव थोरात यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची देशव्यापी दखल घेतली गेली आहे. डॉ.थोरात यांनी सन २००६ ते २०११ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर भर देत त्यांनी प्रवेश, शिष्यवृत्ती, मागास समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यासाठी अनेक धोरणे राबवली. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चचे अध्यक्ष, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डॅलिट स्टडीजचे संस्थापक संचालक पद भूषवित सामाजिक भेदभाव, जातीय विषमता आणि गरीबीवरील संशोधनाला त्यांनी नवा आयाम दिला.
डॉ. थोरात यांच्या संशोधनाचा पाया हा सामाजिक न्याय व आर्थिक समता आहे. दलित-मागासवर्गीय समाजावरील आर्थिक भेदभाव, ग्रामीण विकास, कृषी अर्थशास्त्र, शिक्षणातील विषमता, गरिबी व सामाजिक बहिष्करण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक व सामाजिक विचारांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. त्यांचे कार्य केवळ शैक्षणिक पातळीपर्यंत मर्यादित नसून धोरणनिर्मात्यांना दिशा देणारे ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या मान्यतेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान केला. देश-विदेशातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय पदव्या, पुरस्कार आणि विशेष गौरवांनी सन्मानित करण्यात आले आहे. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून पुढे येत आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ बनलेले डॉ. सुखदेव थोरात हे आजच्या भारतासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. सामाजिक न्याय, समान संधी आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडविण्याची त्यांची धडपड अजूनही सुरूच आहे.


























