चांदवड | महेंद्र गुजराथी
येथील श्रीमान एस. पी. सुराणा विधी महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. यानंतर विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोस्टर मेकिंग, रांगोळी स्पर्धा, संविधान वाचन तसेच संविधान मूल्यांवर आधारित सृजनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संवैधानिक मूल्ये, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये आणि न्यायव्यवस्था यांवर आधारित पोस्टर्स साकारले. रांगोळी स्पर्धेतही संविधानातील विविध घटक, राष्ट्रीय प्रतीके आणि लोकशाही तत्त्वे आकर्षकरित्या मांडण्यात आली. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. पंकज पाळेकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून देत लोकशाही मजबुतीसाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दलची जागरूकता आणि राष्ट्रीय मूल्यांबद्दलची आदरभावना वृद्धिंगत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
—————
फोटो- १) चांदवड येथील श्रीमान एस. पी. सुराणा विधी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजीत विविध उपक्रमांप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक.
२) येथील श्रीमान एस. पी. सुराणा विधी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचन करताना प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आदी.


























