*येवला–राजापूर–नांदगाव रस्त्यावरील नगरसुल येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटी निधी मंजूर*
*येवला (आसिफ पठाण):-* येवला राजापूर नांदगाव रस्ता राज्यमार्ग २५ वर नगरसुल येथील मोठ्या पुलाची पुनर्बांधणी करण्याच्या कामासाठी हिवाळी अधिवेशन पुरवणी अर्थसंकल्पातून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दळणवळणाला अधिक गती मिळणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला–राजापूर–नांदगाव राज्य महामार्ग क्रमांक २५ वरील किमी ८५/७७५ येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल १० कोटींचा निधी पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून मागील काही वर्षांत येवला तालुक्यातील रस्ते, आरोग्य, जलपुरवठा, शेती, सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात अनेक विकासकामांना वेग आला असून हा पूल प्रकल्प त्यातील आणखी एक मोठा टप्पा आहे.
येवला–राजापूर–नांदगाव राज्य महामार्ग क्रमांक २५ वरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असून, या पुलाची स्थिती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. पुलाचे पुनर्बांधणीकरण झाल्याने येवला तसेच राजापूर परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचा प्रवास सुरक्षित व जलद होणार आहे. तसेच या भागातील कृषी, पर्यटन, व्यापार आणि औद्योगिक विकासाला थेट चालना मिळणार आहे.
या महत्वाच्या पायाभूत सुविधेच्या कामाची लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल. येवला तालुक्याच्या उत्तर-दक्षिण संपर्कासाठी तसेच नांदगाव व मनमाड मार्गावरील जोडणीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे येवला ग्रामीण भागाचा सुरक्षित व वेगवान रस्ते संपर्क अधिक मजबूत होणार आहे,

























