शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक: नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांकडून मध्य प्रदेशातून आरोपी जेरबंद, ₹१५ लाख जप्त!

 

नाशिक : शेअर मार्केटमध्ये आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तक्रारदाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील नागोर येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्याशी संबंधित ₹१५ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काय आहे प्रकरण?
सायबर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे गुरनं १०/२०२५ भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९(२), ३(५) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे खोटे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगून त्यांची एकूण ३,६४,०९,३००/- (तीन कोटी चौसष्ट लाख नऊ हजार तीनशे रुपये) रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
दिंडोरी येथील तक्रारदारांनी २०/१०/२०२५ रोजी सायबर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.
पोलिसांची कारवाई आणि आरोपीची अटक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, मा. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये आणि पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पो.कॉ तुषार खालकर , पो.कॉ सुनिल धोक्रट , पो.शि विशाल चौधरी यांच्या पथकाने या गुन्ह्यातील बँक खाती आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारावर पथकाने थेट नागोर, जि. धार, मध्य प्रदेश येथील पत्त्यावर शोध घेतला.
शोध मोहिमेदरम्यान आरोपी अखलाख रईस पटेल याला अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यातील पुरावे प्राप्त झाले असून, तपासामध्ये त्याच्याकडून ₹१५,००,०००/- (पंधरा लाख रुपये) इतकी रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदर कारवाई मा. बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण) आणि मा. आदित्य मिरखेलकर (अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पो. हवा. हेमंत गिलिबिले आणि पो.ना. प्रदीप बहिरम यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नका. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनव्दारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीसाठी संबंधीत बँकेच्या शाखेत जावून खात्री करावी. तसेच, फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास त्यावर क्लिक करू नका.
आपल्यासोबत अशा कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला (संपर्क क्रमांक ०२५३-२२००४०८) संपर्क साधावा किंवा NCCRP पोर्टल व सायबर हेल्पलाईन १९३०/१९४५ यावर तात्काळ तक्रार करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *