समाज दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालय, नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्व. अॅड. बाबुराव ठाकरे स्मृती अभिमुखीकरण आठवडा” अंतर्गत सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एडवोकेट अजय निकम यांनी “मसुदा लेखन व बाह्यरेखा” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळी त्यांनी मालमत्ता खरेदीतील संकल्पना (Concept of Property Purchase), मालमत्ता हस्तांतराचे विविध प्रकार (Concept of Property Transfers), करार मसुदा लेखनाची तांत्रिक बारकावे याबाबत सखोल चर्चा केली. मालमत्तेच्या करारातील अटी-शर्ती, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट व नोंदणी कायदा यातील तरतुदी, सोसायटी कायदा व रेरा कायदा यांचा प्रभाव याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच, बक्षीस पत्र, मृत्युपत्र, अदलाबदल पत्र, हक्कसोड पत्र, गहाणखत, करारनामे यांसारख्या महत्वाच्या कायदेशीर कागदपत्रांची माहिती दिली. सर्च रिपोर्ट, टायटल रिपोर्ट, मोबदला निश्चिती यासंदर्भातही प्रात्यक्षिक व वास्तव उदाहरणे देत त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी कुळाची जमीन, देवस्थानची जमीन, सैनिक जमीन, कृषी व अकृषी जमीन यासंबंधी असलेले विविध कायदेशीर वाद, त्यांचे निराकरण आणि न्यायालयीन प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले. मालमत्ता खरेदी करताना “टायटल क्लिअर असणे, करारातील अटींची स्पष्टता, कागदपत्रांची कायदेशीर तपासणी, वादग्रस्त मालमत्ता टाळणे” या बाबींवर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.या व्याख्यानामुळे विधी महाविद्यालयातील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदे व त्यांची अंमलबजावणी याविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. मालमत्तेतील गुंतवणूक आणि व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आवश्यक असलेले “लीगल ड्यू डिलिजन्स” कसे करावे याविषयीही त्यांनी प्रकाश टाकला.”कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन तेजस्विनी जामदार मॅडम यांनी केले.”
(कल्पेश लचके)






















