जालना जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढणार

 

जालना(महेंद्र बेराड)
जालना : विविध सरकारी प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांची पायपीट थांबावी यासाठी शासनाकडून आपले सरकार केंद्राची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने मार्चमध्ये घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आपले सरकार केंद्राची संख्या वाढणार आहे. सध्या जिल्ह्यात ५६१ सेवा केंद्र कार्यरत आहेत. यात आणखी ७२२ सेवा केंद्राची भर पडणार आहे.
जालना जिल्ह्यांत एकूण ७७४ ग्रामपंचायती आहेत. सध्या ८९४ सेवा केंद्रांना मान्यता आहे. यांतील ६०१ ग्रामपंचायती, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २९३ केंद्रांना मान्यता
देण्यात आलेली आहे. यातील ५६१ सेवा/ -केंद्र कार्यरत असून २५१ केंद्र बंद पडलेले आहेत. तसेच शून्य व्यवहार असल्याने ८२ केंद्र बंद करण्यात आलेले आहेत..
नवीन निकषानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात २ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत; मात्र ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान ४ केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
शहरी भागांतील केंद्रासाठी महापालिका व नगरपरिषद येथील १० हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र, प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान २ केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र ५ अधिक हजारांपेक्षा लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान ४ केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आपले सरकार
केंद्र ८२ विविध कारणांमुळे प्रशासनाने बंद केली आहेत. रिक्त असलेल्या ठिकाणीदेखील आपले सेवा केंद्र प्रस्तावित करण्यात येणार आहे. एक महिन्यानंतर प्रक्रिया सुरू होणार आहे.
ठिकठिकाणी सर्वेक्षण
आपले सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या ७२२ ठिकाणी सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी सर्व्हे पूर्ण झाला आहे. सर्वेक्षणाच्या अंतिम अहवालानंतर सेवा केंद्राच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्र वाटपासाठी प्रक्रिया
सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल आल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी अद्याप एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवीन स्थापन होणाऱ्या सेवा केंद्राच्या ठिकाणांची माहिती प्रशासनाकडून देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *