ज्ञानसाधनेद्वारे मन-शरीर स्थिर ठेवणे शक्य : प. पू. प्रवीण ऋषिजी म.सा.
*‘परिवर्तन चातुर्मास 2025’ अंतर्गत आनंदगाथा सप्ताहात प्रवचन*
सातना (प्रतिनिधी) :
ज्ञानसाधना हेच मन आणि शरीराच्या स्थैर्याचे मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन प. पू. प्रवीण ऋषिजी म.सा. यांनी केले. ते परिवर्तन चातुर्मास 2025 अंतर्गत आयोजित आनंदगाथा सप्ताहात प्रवचनमालेत मार्गदर्शन करत होते.
प्रवचनात त्यांनी सांगितले की, “शरीरासाठी ध्यान आवश्यक आहे. सामायिक क्रिया आणि सामायिक साधना यामध्ये मूलभूत फरक आहे. जसे योगामुळे शरीरावर नियंत्रण ठेवता येते, तसेच ध्यानसाधनेद्वारे शरीर आणि मन दोघांवर नियंत्रण मिळवता येते. हीच साधना आपल्याला परिपक्व शरीर आणि सशक्त मानसिकता प्राप्त करून देते.”
ध्यानाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. एका आसनात स्थिर बसणे हे साधे वाटते पण ते सहज शक्य होत नाही. शरीराला कधी ना कधी पीडा जाणवते आणि मन अस्थिर होते. हीच अवस्था ‘आर्त ध्यान’ होय. म्हणजेच सतत शरीरपीडेचा अनुभव. त्यामुळे या देहाला दुखवटा मुक्त करणे गरजेचे आहे.”
“जर दिवसातील काही क्षण असे असतील की मनाला कोणताही नकारात्मक विचार स्पर्शही करत नाही, तर अपार उर्जा अनुभवता येते. शरीरातही जर काही क्षणही पीडा नसेल, तर शरीर किती शक्तिशाली होईल याचा विचार करा,” असे ते म्हणाले.
शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळवायची असेल तर मन, वाणी आणि कर्म शुद्ध असणे आवश्यक आहे. कारण शरीर स्थिर झाले की मनही स्थिर होऊ लागते आणि विचारशुद्धीची प्रक्रिया सुरु होते.
प. पू. प्रवीण ऋषिजी म.सा. म्हणाले, “भगवान महावीर सांगतात की मनाचा आधार शरीर आहे. त्यामुळे शरीरावर नियंत्रण आवश्यक आहे. देह दु:खमुक्त व व्याधिमुक्त झाला तरच अंतर्बाह्य शुद्धता प्राप्त होईल. यासाठी योग्य मार्गदर्शन, अनुशासन आणि सातत्यपूर्ण साधना आवश्यक आहे.”
“आत्मा हा ईश्वरी स्वरूप असू शकतो, पण शरीराचे प्रशिक्षण बाल्यावस्थेत जरी चालणे-बोलणे यासाठी होत असले, तरी शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. म्हणूनच शरीर, मन आणि वाणी यांना योग्य दिशेने प्रशिक्षित करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ध्यानसाधना हेच प्रमुख साधन आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.


























