अज्ञानामुळेच जीवनात समस्या आणि वाद निर्माण होतात, त्यावर उपाय फक्त ज्ञानच – युवाचार्य प्रवर महेन्द्र ऋषिजी यांचे पनवेल येथे प्रवचन
पनवेल | आचार्य सम्राट आनंद ऋषिजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी सोमवारी जैन स्थानक येथे आयोजित प्रवचन सभेत श्रमणसंघीय युवाचार्य प्रवर महेन्द्र ऋषिजी यांनी श्रद्धाळूंना संबोधित करताना जीवनातील वाद-विवाद, संघर्ष आणि समस्यांचे मूळ अज्ञानात असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ज्ञानाची कास धरा. अज्ञानाच्या गर्तेत अडकलेला माणूस कधीही समाधान शोधू शकत नाही.”
युवाचार्य प्रवर यांनी भगवान ऋषभदेवांच्या अंतिम देशनेचा संदर्भ देत सांगितले की, “त्यांच्या ९८ व्या पुत्राने आपली समस्या मांडल्यावर भगवानांनी उत्तर दिलं – समस्या शोधायच्या असतील, तर मूळ शोधा आणि कर्म सुधारायला शिका.” तेच शिकवण गुरुदेव आनंद ऋषिजी महाराजांनी आमच्या बालपणात दिलं – वाद टाळा, ज्ञान मिळवा.
ते पुढे म्हणाले, “लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी लाखो रुपये खर्च करतात, पण ज्ञान प्राप्तीसाठी आणि ज्ञानींचा सन्मान करण्यासाठी मागे राहतात. ही प्रवृत्ती बदलावी लागेल.”
युवाचार्यश्री यांनी आणखी स्पष्ट केले की, “झगडे हे प्रामुख्याने ‘झर, जमीन आणि जोरू’ यांच्यामुळे होतात. या तिन्ही गोष्टी प्रेम आणि शांतता उद्ध्वस्त करतात. झगडेखोर स्वभाव असणाऱ्यांपासून अंतर ठेवा. झगडा केवळ कटुता वाढवतो; प्रेम निर्माण करत नाही.”
“मनातून राग-द्वेष काढून टाका. आपण अनंत वेळा जन्म घेतला आहे. आता तरी मन अशुद्ध करू नका. मुक्तीसाठी ज्ञान मार्ग स्वीकारा. झाड फक्त पानं सींचून वाढत नाही; मुळं सींचावी लागतात. तसंच समस्यांचंही मूळ शोधूनच समाधान शक्य आहे,” असे ते म्हणाले.
सभेची सुरुवात ‘तित्थयरा मे पसियंतु सिध्दासिध्दिमम् दिसंतु’ या सामूहिक जपाने झाली. सभेचे संचालन मंत्री रणजीत काकरेचा यांनी केले. अनेक भाविकांनी उपवास, आयंबिल, एकासन यासारख्या तपश्चर्यांचा संकल्प युवाचार्यश्रींच्या उपस्थितीत घेतला.
चातुर्मास समितीचे अध्यक्ष राजेश बांठिया यांनी सांगितले की, चेन्नई, बेंगळुरू, इंदूर, पुणे आदी ठिकाणांहून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंगळवारी उपाध्याय केवल मुनिजी महाराज यांची जन्म जयंती सामूहिक एकासना साधनेने साजरी करण्यात येणार आहे.
– प्रतिनिधी: सुनिल चपलोत






















