मार्गदर्शक गुरु नसल्यामुळे प्रगती : होणे अवघड : मुकेश मुनीजी

पुणे – गुरु म्हणजे आत्मोन्नतीचा खरा मार्गदर्शक. गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ एक सण किंवा परंपरा नसून, आपल्या जीवनातील ‘गुरु’ या पवित्र संकल्पनेचे स्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अत्यंत पावन दिवस आहे. गुरु म्हणजे फक्त शास्त्र शिकवणारे शिक्षक नव्हेत, तर आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारे, अज्ञानाचे अंधकार दूर करणारे प्रकाशस्तंभ.
ज्यांनी आत्मा आणि मोक्षमार्ग यांचे खरे स्वरूप समजावले, अशा गुरुंचे स्मरण म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा.
भगवान महावीर स्वामी हे केवळ एक तीर्थंकर नव्हते, तर असंख्य आत्म्यांना मोक्षाचा मार्ग दाखवणारे आदर्श गुरु होते. त्यांचे शिष्य गौतमस्वामी यांनी गुरुभक्ती, शरणागती आणि विनय यांचे अत्युच्च उदाहरण जगासमोर ठेवले.
गौतमस्वामी मूळचे एक विद्वान ब्राह्मण होते. प्रारंभी त्यांना आपल्या विद्वत्तेचा गर्व होता, पण महावीर स्वामींच्या सान्निध्यात त्यांनी आत्मज्ञानाचा खरा अर्थ ओळखला. त्यांनी अहंकार त्यागून गुरूकडे नतमस्तक होत आत्मोद्धाराच्या मार्गावर प्रवेश केला.
महावीर स्वामींनी त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करत, गौतमस्वामींना मोक्षाच्या अंतिम टप्प्यापर्यंत नेले. गुरू-शिष्य यांचा हा नातेसंबंध केवळ ज्ञान देणारा व घेणारा नसून, आत्मजागृती घडवणारा एक पवित्र बंध होता.
जसे सूर्याशिवाय अंधार नाहीसा होत नाही, तसे गुरुविना आत्मा उजळत नाही. आत्मोन्नतीसाठी गुरु अनिवार्य आहेत.
आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत:
आपला खरा गुरु कोण आहे
आपण त्यांचा उपदेश आचरणात आणतो का.
की केवळ बाह्य विनय दाखवतो
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मपरीक्षण आणि गुरूविषयी समर्पण व्यक्त करण्याचा दिवस –
आपण गुरूकडून काय शिकलो
आपण किती आत्मपरीक्षण केलं
आणि आत्मकल्याणासाठी अजून किती वाट चालायची आहे
जैन परंपरेत आचार्य, उपाध्याय, साधू व आर्यिका हे सर्व गुरूंच्या रूपात वंदनीय आहेत. त्यांच्याप्रती श्रद्धा, सेवा आणि नम्रता व्यक्त करणे, हेच गुरुपौर्णिमेचे खरे सार्थक पालन होय.
गौतमस्वामींप्रमाणे आपणही आपल्या गुरूकडे पूर्ण समर्पण व विनयाने वागलो, तर आपले जीवनही नक्कीच मोक्षमार्गाकडे वळू शकेल.
या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी गुरूंशी असलेली आपली आत्मिक नाळ अधिक दृढ करूया.
गुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *