तीर्थक्षेत्र भोयगाव येथे कचरनाथ जनार्दन स्वामी महाराज यात्रा उत्सव

लासलगाव ( ):
सालाबाद प्रमाणे तीर्थक्षेत्र चांदवड तालुक्यातील भोयगाव येथे ओम श्री. कचरनाथ जनार्दन स्वामी आणि खंडेराव महाराज यांचा भव्य यात्रा उत्सव बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा निमित्त मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सामुदायिक आरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, त्यानंतर रात्री अनुग्रह भजन कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता बाबांच्या समाधीला व जनार्दन स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येईल. सकाळी पाच वाजता काकड आरती आणि सकाळी सहा वाजता दर्शन सोहळा सुरू होईल. सकाळी नऊ ते दहा या वेळेत भजन व शाहीर देवानंद माळी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ११ वाजता समाधी मंदिरापासून बाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर सामुदायिक आरती, पाहुण्यांचे स्वागत व मार्गदर्शन होईल.
या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार भास्कर भगरे, आमदार राहुल आहेर, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, संजय जाधव, मनोहरलाल दुबई वाले, गदानीभाई ठाणे, भाईलाल भीमजी गोर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ ते २ या वेळेत श्री जनार्दन स्वामींच्या पादुकांची पालखी व बाबांच्या प्रतिमेचे आणि मातोश्री कांतादेवीमाता यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता खंडेराव महाराज यांच्या रथाची मिरवणूक निघेल. सायंकाळी सात वाजता स्वामींच्या मंदिरात आरती, त्यानंतर रात्री आठ वाजता भजन कार्यक्रम होईल.
गुरुवार, दिनांक २७ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता अभिषेक पूजा व काकड आरतीने यात्रोत्सवाची समाप्ती होईल. अशी माहिती आयोजक नवनाथ केदारे यांनी दिली.
दरम्यान, श्री कचरनाथ स्वामी महाराज यांच्या जीवनपटावर चित्रपट काढण्याचा त्यांचे गुरुबंधू, भक्तगण आणि संस्थान यांचा मानस आहे. या दृष्टीने चित्रपट निर्माता संतोष मांजरेकर हे यात्रा उत्सवादरम्यान भोयगाव तीर्थस्थळी भेट देणार आहेत. या निमित्ताने त्यांचे आज सोमवार रोजी लासलगाव नगरीत आगमन होत असून, ते चित्रपट निर्मिती बाबत चर्चा करणार आहेत. अशी माहिती कैलास केदारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *