पुणे: पर्युषण पर्व हे पीक उगवण्यापेक्षा चांगल बीज रोवण्याचे पर्व आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याचा शोध घेणे गरजेचे आहे. आपल्या आत्म्यामध्ये जितकं चांगलं बी पेरता येईल तेवढं पेरायला हवे असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी केले.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, आपल्या आत्म्याचा प्रवास अनंत काळ चालत असतो. आपला आत्मा जरी निर्मळ, निराकार असला तरी बाह्य गोष्टींमुळे त्याच्या आत दूषित गोष्टी पेरल्या जात असतात. आपल्या या आत्म्याला शुद्ध पवित्र ठेवण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आपलं मन अजूनही सुख सोयी समृद्धी यांच्या मागे धावत आहे. ते मिळवण्यासाठी धडपड करत आहे. खरे समाधान कशात आहे याचे जाणीव आपल्याला अजून होत नाही. मन जसं सुखच समृद्धीच्या मागे धावत तसं संयमासाठी का धडपडत नाही? संयमाची जागा वारंवार असंयम घेत आहे. अशावेळी परमात्म्याने आपल्याला सर्वांनाच अंतगड सूत्ररूपी आरसा दिला आहे. आपले मनःचक्षु उघडून त्या आरशामध्ये डोकावून पाहणं फार गरजेचं आहे. हे सूत्र आपल्यामध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या अंतरात्म्यात बदल घडवून आणू शकते. समजा आत कितीही विष भरलेले असले तरी अमृताचा एक कण त्या विषाचे रूपांतर अमृतात करू शकतो किंवा धुक्याने भरलेल्या वाटेवर सूर्याचा एक किरण ही ती वाट मोकळी करण्यास पुरेसा असू शकतो. अशाच प्रकारे अंतगड सूत्राचा एक किरण आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकणार आहे. यासाठी शरीराची तहानभूक हरपली जाऊन मोक्षाची आस लागली पाहिजे कर्मक्षय करण्याची आग आता लागायला हवी. ज्ञानाचे संयमाची भूक आपल्याला असायला हवी आणि अशी भूक, आग, ओढ लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने लागेल प्रयुषण पर्वाची सुरुवात झालेली असेल. शरीराचे दुःख करत बसण्यापेक्षा आत्म्याच्या वेदना कशा कमी करता येतील? आपल्या शरीरात असलेली चेतना, ऊर्जा केवळ शरीराला होणाऱ्या शारीरिक पीडाचा विचार करत राहणार का? आत्म्याला होणाऱ्या वेदनांची जाणीव आपल्याला कधी होणार? ज्या दुःखाची वेदना होते, तेव्हाच ते दुःख दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. समजा आपल्याला काटा लागला तर तो काटा काढण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणूनच आपण केलेले कर्म याचे जाणीव होऊन त्यातील दुःख, वेदना समजणं गरजेचं आहे. तरच आपला कर्मक्षय होईल. जेव्हा आपल्या संवेदना जाग्या होतील तेव्हाच आत्म्याला झालेल्या व्याधी दूर करता येईल. आपल्या आत असलेल्या मोह, माया, क्रोध, अहंकार, लोभ, राग या यादींची आपल्याला जाणीवच होत नाही त्यामुळे त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करत नाही आणि अशा जडलेल्या विकारांमध्येच आपण जगत राहतो. त्यामुळे केलेली चूक ही चुक वाटत नाही. केलेल्या पापाच्या परिणामांना घाबरतो पण पाप करण्यास घाबरत नाही. आपण करत असलेल्या वाईट गोष्टींची जाणीव न झाल्याने आपण त्या दूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने आपण कर्माच्या फेऱ्यात अडकून राहतो. आत्म्यापासून आत्म्यापर्यंत एकरूप होण्याकरता स्वतःमध्ये चांगल्या गोष्टींचे परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करा.
आपल्या अंतरात्म्याचा शोध घ्या : प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.






















