संदिप गुंजाळ, दिंडोरी |
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मुद्दा सध्या चर्चेचा ठरला आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवत संवर्ग एक मध्ये प्रवेश करणे आणि सोयीनुसार बदली करून घेत वर्षानुवर्षी एका जागेवर ठाण मांडून बसणे असाच काहीसा प्रकार जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात आढळून येत आहे. याबाबत तक्रारी प्राप्त होतात महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने सचिव तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना बोगस दिव्यांगाचा शोध घेण्यासाठी पत्र व्यवहार केला. तरी देखील पाहिजे तसे चौकशी न झाल्याने बनावट दिव्यांगांचा शोध अपूर्णच राहिला असे म्हणता येईल. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत स्मरण पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता या बनावट दिव्यांगांचा शोध ल लावण्यासाठी नाशिकच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने बोगस दिव्यांगाचा शोध घेण्यासाठी पत्र व्यवहार झाल्यावर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहीम हाती घेतली. त्याबाबत परिपत्रक काढून ७ दिवसांत युडीआयडी कार्ड पडताळणी करण्याच्या सुचना दिल्या. या निर्णयाचे स्वागत करत प्रमाणपत्र पडताळणी बरोबर संबंधित व्यक्तीची देखील नव्याने तपासणी करण्याच्या मागणीला देखील दुजोरा देण्यात आला. त्यामुळे नक्कीच बोगस दिव्यांगांचा पर्दाफाश होणार अशी अपेक्षा व्यक्त होत असताना आवश्यक ते कृतिशील पाऊल न उचलल्या गेल्यामुळे या बोगस दिव्यांगांचा शोध पूर्ण झाला नाही अशीच काहीशी चर्चा सुरू आहे.
परंतु आता पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना स्मरण पत्र देत संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत सूचना करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आपल्या दिव्यांग शोध मोहिमेला गती देत नाशिक जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार बोगस दिव्यांगांना धडा शिकवणार अशी अपेक्षा व्यक्त केले जात आहे.
*यासाठी प्रमाणपत्राबरोबर संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक*
खरंतर एखादा कर्मचारी खरोखर दिव्यांग असेल तर तो नोकरीपूर्वी दिव्यांग असायला हवा. नोकरी नंतर नैसर्गिकरित्या किंवा अपघाती अपंगत्व आलेले असल्यास त्याने ते प्रमाणपत्र मिळून आपल्या प्रशासनाकडे सादर करून त्यानंतर त्याची वरिष्ठ आरोग्य विभागाकडे पडताळणी होऊन प्रशासनामार्फत आपला संवर्ग बदलून घेतलेला असायला हवा. तसेच त्याचे सेवा पुस्तकात नोंद होऊन त्याला दिव्यांग भत्तेही सुरू असले पाहिजे. परंतु अचानक बदलीच्या वेळी प्रमाणपत्र जोडले जाऊन शेकडो बदल्या झाल्या असल्याची चर्चा आहे याबाबत अनेक तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे बोगस दिव्यांगांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करतांना संबंधित व्यक्तीचीही तपासणी व्हावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ चारूदत्त शिंदें यांनी देखील प्रमाणपत्र बरोबरच संबंधित व्यक्तीचे देखील प्रत्यक्ष पडताळणे करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनाला कृतिशील गती देत या बोगस दिव्यांगांचा शोध पूर्ण होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


























