मित्रता नसल्यास आत्मसुद्धी शक्य नाही मुकेश मुनीजी

जैन धर्मातील “चार अनंत चतुर्विध” भावनांमध्ये — मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा — यामध्ये पहिली भावना म्हणजे मैत्री. “मैत्री भवतु सर्वेषां जीवनाम्” अर्थ: सर्व जीवांशी माझं नातं मैत्रीपूर्ण असो. हे केवळ उच्चारायचं वाक्य नाही, तर आत्म्याच्या व्यवहारात उतरवण्यासारखं एक दिव्य सूत्र आहे.

सुदामा हे गरीब ब्राह्मण, कृष्ण द्वारकेचा राजा. तरीही कृष्णानं आपल्या लहानपणच्या मित्राला विसरला नाही. गरीबीत आलेल्या सुदाम्याला पाहून श्रीकृष्णाने त्याचे पाय धुतले. त्याच्या डोळ्यात पाणी आले, पण त्याच्या हृदयात होती खरी मैत्री. ही होती निष्कलंक, निस्वार्थ, दिव्य मैत्री.

दुर्योधनाने कर्णाला राजा केलं, मान दिला. आणि कर्णाने अखेरपर्यंत आपलं मित्रधर्म निभावलं—युद्धभूमीत आपल्या मृत्यूचा स्वीकार करताना सुद्धा! ही होती एक प्रकारची निष्ठेची मैत्री—जरी त्या मार्गात अधर्म होत असला, तरी नात्याची शुद्धता त्याच्या आचरणातून दिसते.

मैत्री ही योग्यतेशी, धर्माशी, आणि करुणेशी जोडलेली असावी. अन्यथा ती अंधमैत्री होऊन अधर्माच्या वाटेला लावू शकते. म्हणूनच, जैन धर्म आपल्याला शिकवतो, मैत्री सर्व प्राण्यांशी असावी—स्वार्थरहित, सर्वसमावेशक.

मैत्री ही एक नातेसंबंधाची भावना असली, तरी ती कोणाच्या आग्रहाने तयार होत नाही.

मैत्री हे असं नातं आहे, जे आपण स्वतः घडवतो. त्यामुळे चांगली मैत्री व्हावी, शुद्ध आणि उन्नत मैत्री व्हावी, याची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्या स्वतःवरच असते.

आपण अनेकदा बाह्य जगाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याआधी एक अत्यंत आवश्यक टप्पा आपल्या आयुष्यात यायला हवा — तो म्हणजे, स्वतःच्या आत्म्याशी मैत्री.

ज्याने आपल्याच आत्म्याशी मैत्री केली नाही, स्वतःला ओळखलं नाही, स्वतःच्या अंतरंगाशी संवाद साधला नाही, तो दुसऱ्यांशी खरी, टिकणारी, आणि आध्यात्मिक मैत्री कशी करणार?

“आत्मा हा स्वतःच उद्धारकर्ता आहे. स्वतःचाच शत्रू आहे आणि स्वतःचाच मित्र आहे.”

आपण जर आपल्या आत्म्याशी एकनिष्ठ राहिलो, आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहिलो, तर आपल्या जीवनाचा खरा उद्धार होतो. हीच आत्ममैत्री पुढे जाऊन आपल्या मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करते. कारण आत्म्याशी मैत्री म्हणजे — आपल्या वासनांवर विजय, आवडीनिवडींपेक्षा सत्यावर प्रेम, आणि स्वतःच्या अंतरातील दैवी प्रकृतीशी एकरूप होणं.

मैत्री ही केवळ भावनिक व्यवहार नाही, ती एक आध्यात्मिक साधना आहे. जेंव्हा आपण सर्व प्राण्यांशी मैत्री ठेवतो, तेव्हा आपण आपल्या “बंध” आणि “मोह” यांच्यावर मात करतो. जेंव्हा द्वेष संपतो, तेंव्हाच मोक्षाचा प्रकाश दिसू लागतो.

भगवंत महावीर म्हणतात — “जगात सर्वांत मोठा विजय हा स्वतःवर मिळवलेला विजय आहे.” आणि तोच विजय आत्ममैत्रीच्या द्वारे शक्य होतो.

चांगली मैत्री हवी असेल, तर ती स्वतःपासूनच सुरू व्हायला हवी. आपण आपल्याच आत्म्याशी मैत्री केली, तर ती दिव्य मैत्री संपूर्ण विश्वाशी आपोआप जोडली जाईल. मैत्रीच्या या जैन तत्त्वज्ञानातून आपण आत्मोद्धार, करुणा आणि अखेरीस मोक्ष याचा मार्ग प्रसन्न करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *