निफाड (दीपक श्रीवास्तव)
मालेगाव तालुक्यातील चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. समाजमन हादरवून टाकणाऱ्या या क्रूर कृत्याचा सर्व समाजघटकांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर—फाशीची—शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
पीडित बालिका सोनार समाजातील असल्याने केवळ सुवर्णकार समाजच नव्हे, तर सर्व समाजबांधवांनी न्यायासाठी एकमुखाने आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर निफाड शहर सुवर्णकार समाजाने राज्य शासनाने या प्रकरणात विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे.
समाजाच्या वतीने अध्यक्ष राजाभाऊ छबुशेठ नागरे व उपाध्यक्ष उमाकांत बाबुराव आहिररात यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाने गुन्ह्याच्या तपासात तातडीने गती आणावी, आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबास भरीव आर्थिक मदत त्वरित मंजूर करावी, अशी मागणी केली.
बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून शासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच समाजानेही जागरूकतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे समाजनेत्यांनी सांगितले. शासनाने योग्य योजना राबवल्यास निफाड सुवर्णकार समाजाने स्वयंप्रेरणेने समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर निफाड तालुका तसेच परिसरात तीव्र संताप पसरला असून निष्पाप चिमुरडीच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवेदनावर गणेश नागरे, अमित जाधव, धीरज बिनायकीया, तुषार आदापुरे, राहुल नागरे, मनोज आहेरराव, सचिन दंडगव्हाल, राजेश जाधव, किरण जाधव, दीपक दानवे, उद्धव नागरे, विकी बागुल, सचिन अधापुरे, शशिभूषण आहेराव, प्रदीप नागरे, कुणाल आहेराव, अप्पा आहेरराव, ओम लोणगे आदींच्या सह्या असून सुवर्णकार समाज एकजुटीने पीडित कुटुंबाच्या पाठिशी उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.
*मालेगाव निर्घृण हत्ये प्रकरणी निफाड परिसरात संताप पसरला आरोपीला फाशीची शिक्षा द्या!*


























