तुमच्या शरीराला तुम्ही भोगाचे केंद्र बनवू शकता किंवा रोगाचेही केंद्र बनवू शकता. आपण आपली शक्ती शरीराला धर्माचे केंद्र बनवण्यासाठी खर्च करायला हवी. शरीर एकदा का धर्माचे मंदिर बनले की त्यात मन आपोआपच राहू लागेल. ते इकडेतिकडे भटकणार नाही. त्यामुळे आपल्या शरीराला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन चातुर्मास २०२५ निमित्त आयोजित प्रवचनमालेत ते बोलत होते. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, इंद्रभूती गौतम यांनी भगवान महावीरांनी विचारले, दोन मल्ल लढत होते. दोघेही तुल्यबळ होते तरीही एक हारतो एक जिंकतो असे का होते? त्यावर भगवान महावीरांनी सांगितले की, ज्याने आपल्या शक्तीचा १०० टक्के उपयोग केला तो जिंकला. जो १०० शक्तीचा वापर करू शकला नाही तो हारला. लक्षात घ्या की, शक्तीला बुद्धी नाही. जिथे शक्तीला बुद्धीची जोड मिळते तिथे अशक्य वाटणारी कामेही होऊन जातात. बुद्धाचा वापर न करता जे काम करतात त्याला अनाभोग वीर्य म्हणतात. आपल्या शक्तीला प्रशिक्षित कऱणे गरजेचे आहे. आपल्या ऊर्जेला दिशा देणे आवश्यक आहे.
दुरून डोंगर साजरे… असं आपण म्हणतो. चालताना दुसऱ्या रस्त्यांकडे पाहूच नका. आपल्या ऊर्जेचा, शक्तीचा, मेंदूचा एक पॅटर्न तयार व्हायला हवा. चालताना नजर रस्त्यावर राहणे गरजेचे आहे तसेच आपल्या पावलांकडेही लक्ष द्या. टाच पहिल्यांदा टेकून चाललात तर घर्षण कमी होईल आणि पायावरचा ताण कमी होईल. इतक्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवून शरीराकडे पाहणे गरजेचे आहे. छोटासा बदल वाटला तरी तो महत्त्वाचा आहे. चालताना आपल्या मनाला चालण्यामध्येच ठेवा. त्याला भटकू देऊ नका. जे कराल त्यातच राहायला शिका.


























