*मनमाड-उमराणे मार्गावर खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल*

उमराणे (विनोद पाटणी)
मनमाड-मालेगाव महामार्गावरील (National Highway 3) चोंडीबारीत सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाकडून अवजड वाहतूक वारंवार मनमाड-गिरणारे-उमराणे या राज्यमार्गावर वळवली जात आहे. मात्र, आज दि 18रोजीही वाहतूक गिरणारे मार्गे वळवण्यात आली होती त्यामुळे हा पर्यायी मार्गच आता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
मनमाड ते उमराणे या रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, गिरणारे गावात महाविद्यालय, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींची नियमित वर्दळ असते. परिणामी, अवजड वाहतूक व खड्ड्यांमुळे गिरणारे गावांमध्ये सकाळी-सकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामुळे वाहनधारकांना आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खड्डेच खड्डे! रस्त्याची झाली चाळण
मनमाड ते उमराणे या मार्गावर सायंगोल कारखान्याजवळ, राणमळा, डोणगाव, आणि दरेगावजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. यंदा सलग सहा महिने झालेल्या पावसामुळे रस्त्याचे डांबर उखडून खडी बाहेर आली आहे. या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे गाडी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मनमाड ते गिरणारे पर्यंत संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
* अवजड वाहनांची कसरत: हा महामार्ग क्रमांक आठचा पर्यायी रस्ता असल्याने अवजड वाहने, कांद्याने भरलेले ट्रक आणि इतर वाहनांची मोठी रहदारी असते. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करत गाड्या चालवाव्या लागत आहेत.
* रस्त्याची धोकादायक स्थिती: डोणगाव येथील मोरीजवळ रस्त्याच्या कडेला रस्ता खचलेला आहे. दरेगाव येथील पुलाजवळ पावसाळ्यापूर्वी केलेले डांबरीकरण व खडीकरण निकृष्ट ठरले असून, पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत.
ग्रामस्थांची मागणी: काम तातडीने मार्गी लावा
चोंडी घाटातील अपघातांना पर्याय म्हणून पाहिले जाणाऱ्या या मार्गाच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी गिरणारे ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाने मनमाड-गिरणारे-उमराणे मार्गाचे काम त्वरित आणि कायमस्वरूपी मार्गी लावावे, जेणेकरून विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *