पुण्यात पर्युषण महापर्वाचा शुभारंभ
परिवर्तन चातुर्मास २०२५ अंतर्गत पुणे जैन समाजाचा उत्साही सहभाग
पुणे : परिवर्तन चातुर्मास २०२५ अंतर्गत पुणे शहरात आज पर्युषण महापर्वाचा शुभारंभ अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने झाला. उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषिजी म.सा. (आदि ठाणा-२), दक्षिणज्योति प.पू. श्री आदर्शज्योतिजी म.सा. (आदि ठाणा-३) तसेच जिनशासन गौरव प.पू. श्री सुनंदाजी म.सा. (आदि ठाणा-६) यांच्या पावन सान्निध्यात आजचा हा शुभ दिवस मंगलमय ठरला.
सकाळी अंतगड सूत्र वाचनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या विशेष वाचनात ९० सिद्ध आत्म्यांचे जीवन आणि त्यांच्या मोक्षमार्गाच्या कथा श्रद्धापूर्वक सांगितल्या गेल्या, ज्यातून आत्मशुद्धी आणि आत्मजागरणाचा अद्वितीय संदेश लाभतो.
सायंकाळी प्रतिक्रमणाचे आयोजन करण्यात आले असून, यात आत्मावलोकन, आत्मशुद्धी आणि क्षमा-भावाने श्रद्धाळू सहभागी होतील. दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची मालिका सुरू राहिली, ज्यात पुणे जैन समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी परिवर्तन चातुर्मास समितीतर्फे दानवीर उद्योगपती प्रकाश धारीवाल व दीना धारीवाल यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
“गुरुदेवांच्या सान्निध्यात हे पर्व आत्मा पवित्र करण्याची अद्वितीय संधी आहे. समाजाची एकता आणि समर्पण पाहून हृदय आनंदित झाले.” – प्रकाश धारीवाल, दानवीर उद्योगपती
“पर्युषण महापर्वाचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिकही आहे. या पर्वाने समाजाला आत्मशुद्धी आणि संघटनाचा नवा संदेश दिला आहे.” – राजकुमार चोरडिया, ज्येष्ठ उद्योगपती
“समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्रिय सहभागामुळे हे आयोजन ऐतिहासिक ठरले आहे. पुणे जैन समाजाची ही एकजूट संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.” – सुनील नहार, अध्यक्ष : चातुर्मास समिती






















