विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून उपक्रमास सुरुवात
निफाड
राज्य शासनाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह – २०२५” अंतर्गत निफाड तालुक्यात ३३ युवक–युवतींची महसूल दूत म्हणून निवड करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला युवा प्रतिसाद लाभला असून, तहसील कार्यालयात महसूल दूतांचे स्वागत करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
महसूल दूत या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा, योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. निवड झालेल्या दूतांना डिजिटल क्रॉप सर्वे, ई-फेरफार, ऑनलाईन दाखले, शिष्यवृत्ती योजना, नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे अशा विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.महसूल दूत हे केवळ माहिती देणारे प्रतिनिधी नसून, प्रशासन आणि समाज यामधील सेतू ठरणार आहेत. हा उपक्रम इतर तालुक्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
प्रतिक्रिया
“महसूल दूत” ही संकल्पना केवळ माहिती पोहोचवण्यासाठी नसून, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाण आणि कार्यक्षमतेचा विकास व्हावा यासाठी राबवली जात आहे. महसूल विभाग आणि तरुणाई यांच्यातील ही नवी बांधिलकी आहे.
डॉ शशिकांत मंगरुळे
उपविभागीय अधिकारी निफाड
प्रतिक्रिया
महसूल दूत उपक्रमामुळे महसूल विभागाच्या सेवा व विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून लोकसहभाग वाढविण्यास मदत होणार आहे. निफाड तालुक्यात ३३ जणांची महसूलदूत म्हणून करण्यात आली आहे.
विशाल नाईकवाडे
तहसीलदार निफाड
प्रतिक्रिया
महसूल विभागाशी थेट जोडले जाण्याची ही अनोखी संधी आहे. आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण अत्यंत उपयोगी असून, आम्ही गावपातळीवर हे ज्ञान पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
कु.गौरी कुमावत
चांदोरी
प्रतिक्रिया
या उपक्रमामुळे शासकीय प्रक्रिया समजल्या,आणि नागरिकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली.भविष्यातील शासकीय सेवेसाठी हा अनुभव मोलाचा ठरेल.
ओंकार शिंदे लासलगाव
फोटो
नवनियुक्त महसूल दूत यांचे स्वागत करतांना तहसीलदार विशाल नाईकवाडे, शरद घाटगे, सागर रोकडे आदिसह महसूल दूत






















