जीवनातील श्रेष्ठता जागी करा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

पुणे परमात्म्याने साधू-सज्जनांना मधमाशीची उपमा दिली आहे. कारण मधमाशी वीष तयार करत नाही आणि इतर कोणाला ते पसरवतही नाही. ती फक्त तिच्यातील मधाचा गोडवा सर्वांना देत असते. तसं आपलं जीवन असलं पाहिजे. तरच आपल्या जीवनात श्रेष्ठता जागी होऊ शकेल. यासाठी स्वतःला पूज्य कसं बनवता येईल त्या पूजनीय बनण्याच्या मार्गांवरून कसं चालता येईल यावर ही चिंतन करणं गरजेचे आहे, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी व्यक्त केले.
परिवर्तन चातुर्मास २०२५ मध्ये आयोजित प्रवचनमालेत ते बोलत होते. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, समोरच्यात चांगल पाहिलं तर आपल्याला चांगलंच मिळतं. पण जर त्यात वाईट पाहिलं तर आपल्या पदरात वाईटच येतं. यासाठी तुमची दृष्टी कशी आहे. तुमचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहणे गरजेचे आहे. पूजनीय होणं म्हणजे लोकांनी आपली पूजा-अर्चना करणे नसून स्वतःच्या आतील श्रेष्ठता प्रकाशित करणे होय. पूज्य होण्याच्या मार्गातील अजून एक लक्षण म्हणजे जो रत्नाधिक आहे, ज्ञानाने-ध्यानाने श्रेष्ठ आहे त्यांच्या सहवासात राहतांना त्यांच्याविषयी विनम्र भाव असणं गरजेचे आहे.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, आपल्यापेक्षा वयाने, मानाने लहान व्यक्तीने दिक्षा घेतली तरी त्याच्या प्रति उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ हा भाव नसून तो रत्नाधिक आहे हा सत्यवादी भाव हवा. सत्ता आणि संपत्तीच्या अंहकारातून खाली उतरणं सोपं आहे. पण संयम, साधनेच्या, ज्ञानाच्या, तपश्चर्येच्या अहंकाररुपी हत्तीवरून उतरणं अवघड आहे. या अंहकारातून जो उतराला तो पूज्य असतो.
श्रद्धा निर्माण होताना आयुष्य निघून जातं. पण श्रद्धेला तडा जायला एक क्षणही पुरेसा असतो. त्यामुळे ज्याला वंदन करणार आहात त्याच्याप्रति श्रद्धा ठेवावी. त्याचं समीक्षण करू नये. अशाने आपल्यातीलच श्रद्धेचा भाव हरवत जाईल. यासाठी जेष्ठ-श्रेष्ठ, दैवत्व असणाऱ्या व्यकीचा आदर मान करता यायला हवा. दुसऱ्यांच्या आतील ज्येष्ठता, त्याचं मोठेपण पाहता यायला हवं असं झालं तरच आपल्या आतील श्रेष्ठतेचा उदय होऊ लागतो. आपल्या आतील अहंकार तोडण्याची साधना करत राहणं हेच सूत्र श्रेष्ठत्व, पूज्यत्व प्राप्त करण्याचं आहे. हा अहंकार असाच राहिला तर तुमच्या आतील श्रेष्ठतेला दडपणारं सूत्र आणि देवत्वाला लपवणारा मंत्र हा अहंकार असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *