*नाशिक महानगरपालिका निवडणूक…*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती*
*दांडगा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी असलेल्या सक्षम उमेदवारांना संधी – माजी खासदार समीर भुजबळ*
*नाशिक :-* नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या आहेत. हा सर्व अहवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर सर्वानुमते दांडगा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी असलेल्या सक्षम उमेदवारांना संधी देण्यात येईल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भुजबळ फार्म, नाशिक येथील कार्यालयात यशस्वीरीत्या पार पडल्या. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, आजच्या मुलाखतीसाठी २०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलखती दिल्या. यामध्ये आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पूर्णपणे सज्ज असून नाशिक शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल असलेला विश्वास, पक्षाची ताकद तसेच कार्यकर्त्यांमधील उत्साह स्पष्टपणे दिसून येतो आहे. लवकरच वरिष्ठ नेत्यांशी तसेच ज्येष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निर्णय घेऊन पक्षाच्या धोरणानुसार योग्य,सक्षम,लोकप्रिय व जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल,असा विश्वासही माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात या मुलाखतींसाठी नाशिक शहरातील विविध ३१ प्रभागांतून २०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सकाळी १० पासून सुरु झालेल्या मुलाखती सायंकाळी उशिरापर्यंत घेण्यात आल्या. यावेळी भुजबळ फार्म येथील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची सामाजिक बांधिलकी, पक्षाशी असलेली निष्ठा, निवडून येण्याची क्षमता, दांडगा जनसंपर्क, संघटनात्मक कामगिरी, प्रभागातील कामाचा अनुभव तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठीची तयारी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा विचार करूनच ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मजबूत पकड निर्माण करण्यासाठी पक्ष संघटना, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार एकत्रितपणे काम करत असून आगामी निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल, असा ठाम विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.


























