नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५५ हजारांची सोन्याची अंगठी चोरीचा गुन्हा उघड
लासलगाव : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) निफाड तालुक्यातील लासलगाव येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीप्रकरणी ‘बंटी-बबली’ टोळीला मालेगाव शहरातून जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेला ५५ हजार रुपये किमतीच्या सोन्याची अंगठी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लासलगाव शहरातील वर्मा ज्वेलर्स या दुकानात एक काळा बुरखा घातलेली महिला आणि तिच्यासोबत एक पुरुष आले होते. सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी काउंटरवरील ट्रेमधील दागिने पाहण्यास सुरुवात केली. यावेळी, त्यांनी हातचलाखीने ट्रेमधील ५ ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे ५५,०००/- रुपये असलेली सोन्याची अंगठी चोरली आणि त्याऐवजी एक बनावट बेनटेक्सची अंगठी ठेवून चोरी केली होती. याबाबत लासलगाव पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी अभिलेखावरील आरोपींना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मालेगाव शहरातील सलीमनगर, कुसूंबारोड परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीं नाजीया शेख ईसराइल, वय ३२, रा. सलीम नगर, मालेगाव, जि. नाशिक
तर शेख करीम शेख आमीन, वय १९, रा. गायकवाड चौक, मालेगाव, जि. नाशिक
या दोघांनी चौकशीदरम्यान लासलगाव येथील ज्वेलर्स दुकानातून सोन्याची अंगठी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेली अंगठी मालेगाव येथील एका ज्वेलर्स दुकानात १५,०००/- रुपयांना मोडल्याचेही सांगितले. सदर दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी लासलगाव पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि त्यांच्या पथकाने केली.


























