*ब्रेक मारण्याचा कंटाळा’ आणि* *तक्रार पुस्तिकाही गायब’! उमराणे एस.टी. थांब्यावर नागरिकांची गैरसोय; एस.टी.ची मनमानी थांबणार कधी?*

उमराणे (वार्ताहर): मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (NH-3) वसलेल्या आणि कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमराणे (ता. देवळा) गावातील एस.टी. प्रवाशांना सध्या ‘एस.टी. थांबत नाही’ यापेक्षाही गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सुमारे २० ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या या व्यापारी गावात बस थांबत नसल्याने विद्यार्थी आणि व्यावसायिक त्रस्त आहेत. मात्र, तक्रार करण्याची सोयही कर्मचाऱ्यांनी काढून टाकल्याने येथील संतप्त प्रवाशांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
बस थांबली नाही, १०० मीटरवर प्रवाशाला उतरवले
नाशिकहून शहादाकडे जाणारी एमएच-१४ एमएच-६९८४ क्रमांकाची बस नुकतीच उमराणे बस थांब्यावर न थांबता १०० मीटर आधीच थांबली आणि एका प्रवाशाला तिथेच उतरवून पुढे निघाली. थांब्यावर उभे असलेले प्रवासी बसू नयेत, यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
रोहित देवरे या स्थानिक प्रवाशाने धाडसाने बस आडवून चालक-वाहकाला जाब विचारला असता, त्यांनी उडावा-उडावीची उत्तरे दिली.
आणि ” तक्रार पुस्तिकाही ‘गायब’
चालक-वाहकाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी नियमानुसार कंडक्टरकडे ‘तक्रार पुस्तिका’ (Complaint Book) देण्याची मागणी केली. मात्र, यावर वाहकाने दिलेले उत्तर अधिक संतापजनक होते:
“बसमध्ये तक्रार पुस्तिका उपलब्ध नाही!”
विशेष म्हणजे, बसमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की, “मागितल्यास तक्रार पुस्तक मिळेल.” परंतु, कर्मचाऱ्यांनी हे नियम थेट पायदळी तुडवले. या गंभीर प्रकारामुळे एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रवाशांप्रति असलेले गैरवर्तन आणि त्यांना वरिष्ठांकडून मिळणारे अभय स्पष्ट होते.
व्यापारी आणि विद्यार्थ्यांची अडचण
* व्यापारी वर्ग: येथून अनेक नागरिक नाशिक, चांदवड, मालेगाव आणि धुळे यांसारख्या शहरांमध्ये व्यवसायानिमित्त वारंवार प्रवास करतात. बस न थांबल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक आणि वेळेचे नुकसान होत आहे.
* शिक्षणार्थी: शालेय आणि कॉलेजचे शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ‘अप-डाऊन’ करतात. त्यांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत असल्याने त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम होत आहे.
उमराणेकरांचा थेट इशारा: ‘तीव्र आंदोलन अटळ!’
उमराणे येथे बस नियमित थांबावी, यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलने केली आहेत, पण ‘जैसे थे’ परिस्थिती आहे.
“राज्य शासनाने थांबा मंजूर केलेला असतानाही एस.टी. कर्मचाऱ्यांची ही मनमानी, तक्रार पुस्तिकाही न देण्याचा उद्दामपणा सहन केला जाणार नाही,” असा संतप्त पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
यासंदर्भात तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी आणि सर्व बसेस उमराणे येथे थांबाव्यात, अशी मागणी उमराणेकर करत आहेत. जर या समस्येवर त्वरित तोडगा निघाला नाही, तर यापुढे याहूनही तीव्र, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उमराणे ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *