गोपाळकुमार कळसकर
तालुका प्रतिनिधी, भुसावळ
भुसावळ : चर्मकार विकास संघ,जळगाव व महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंतरराज्य स्तरीय तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा २ नोव्हेंबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळ, जळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडला. जळगाव येथे हा तृतीय मेळावा पार पडला. समाजबांधवांचा या मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून ५३५ वधू-वरांनी आपला परिचय यावेळी दिला. कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी ना. संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी महापौर व जिल्हा शिवसेना प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, डॉ. संदीप भारूळे, सरपंच राजेश वाडेकर, मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर, ऊर्जा विभागाचे निरीक्षक गणेश सुरडकर, प्रदेश उपाध्यक्ष इ.उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.मेळाव्याचे प्रास्ताविक संजय खामकर व डॉ. संजय भटकर यांनी केले. या प्रसंगी समाजाच्या विवाह क्षेत्रातील आधुनिकतेच्या दिशेने एक पाऊल म्हणून ‘ऋणानुबंध’ या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात विवाहित, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच अपंग वधू-वरांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व वधू-वरांना आपला परिचय देण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने मिळाली. मान्यवरांनी समाजातील या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करताना, गुरु रविदास महाराजांचा भव्य पुतळा आणि सभागृह बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, अॅड. डॉ. अर्जुन भारुडे, प्रकाश रोजतकर, कमलाकर ठोसर, राजेश वाडेकर, मनोज भाऊ सोनवणे, ज्योतीताई निंभोरे, गणेश काकडे, डी. बी. मोरे, श्री. गजानन दांडगे, संदीप ठोसर, योगिता वानखेडे, सुनीता वानखेडे, लता सावकारे, प्रा. संदीप शेकोकार, पंकज तायडे, शिवदास कळसकर, उषाताई दांडगे, श्रीमती संगीता चिमणकर, यशवंत वानखेडे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वानखेडे सर, प्रा. धनराज भारुडे आणि डॉ. संजय भटकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर अॅड. डॉ. अर्जुन भारुडे यांनी आभारप्रदर्शन केले. एकात्मतेचा, संस्कारांचा आणि समाजहिताचा संदेश देणारा हा मेळावा भावनिक वातावरणात पार पडला. समाजातील सर्व थरातील बांधवांचा सहभाग पाहता, हा मेळावा चर्मकार समाजाच्या ऐक्य, प्रगती आणि नव्या दिशेचा सुंदर आरंभ ठरला,अशा शब्दात उपस्थित वधू,वर व पालकांनी भावना व्यक्त केल्या.


























