पाटोदा (गणेश शेवाळे) राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ असे अधिकृतपणे जाहीर करून अनेक वर्ष झाले असतानाही पाटोदा–चुंबुळी महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर अजूनही ‘अहमदनगर’ हे जुने नावच दिसत असल्याने प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे.या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना नेमकी दिशा कोणती, आणि कोणता मार्ग योग्य हे समजत नसल्याने सतत संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होत असून अनेकांना चुकीच्या मार्गावर जावे लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमध्ये “जिल्ह्याचे नाव बदलले, सरकारी आदेश आले… पण बोर्ड बदलण्याची प्रशासनाला फुरसत नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. जुने नाव असलेले फलक अद्याप बदलले न गेल्याने प्रशासनाचा गलथान व बेफिकीर कारभार उघड झाल्याची टीका होत आहे.या संदर्भात संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दिशादर्शक फलकावरील नाव अद्ययावत करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*अहिल्यानगर नाव बदललं… पण पाटोदा–चुंबुळी मार्गावरचे बोर्ड अजूनही ‘अहमदनगर’; प्रवाशांची दिशाभूल, प्रशासनाचा गलथान कारभार उघड!*

























