उमराणे (वार्ताहर):
साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना साक्री (जि. धुळे) जवळ झालेल्या भीषण अपघातात उमराणे येथील एका विवाहितेसह माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे उमराणे आणि मालपूर (कासारे) परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात आणि तिघांचा बळी
उमराणे येथील माऊली मेन्स पार्लरचे संचालक गणेश बाजीराव पगारे यांची पत्नी प्रतिभा गणेश पगारे (वय २८), त्यांचा चुलत भाऊ विजय रघुनाथ जाधव (वय २६) आणि विजय यांची आई प्रमिला रघुनाथ जाधव (वय ५५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पगारे आणि प्रतिभा पगारे हे काल (दिनांक 10) त्यांच्या MH 15 BF 8814 या एर्टिगा कारने प्रतिभा यांचा चुलतभाऊ विजय जाधव यांच्या साखरपुड्यासाठी मालपूर-कासारे येथून विजय, त्यांची आई प्रमिला जाधव, महेंद्र जाधव, आणि संकेत जाधव यांना घेऊन सुरत येथे गेले होते. गाडीत एकूण सात जण होते.
सुरत येथे दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री सुरतहून परत येत असताना, मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास साक्री (जि. धुळे) जवळील कातरणी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव कार डिव्हायडर तोडून पुलाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रतिभा पगारे, विजय जाधव आणि प्रमिला जाधव यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र जाधव आणि संकेत जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
सुदैवाने लहान मुलांचा बचाव
या हृदयद्रावक घटनेत सर्वात दिलासादायक बाब म्हणजे गाडीतील दोन लहान मुले सुदैवाने बचावले. प्रतिभा पगारे यांच्या मांडीवर असलेला चार वर्षांचा मुलगा वल्लभ आणि गणेश पगारे यांच्या मांडीवर असलेली कुमारी कार्तिकी पगारे (वय ६) हे दोघेही सुरक्षित आहेत.
रात्री उशिरा ही बातमी कळताच नाभिक समाजात खळबळ उडाली. समाजातील कार्यकर्त्यांनी तातडीने साक्री येथे धाव घेतली.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
आज (दिनांक 11) दुपारी तीन वाजता स्व. प्रतिभा पगारे यांच्यावर उमराणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे, मालपूर-कासारे येथे स्व. विजय जाधव आणि स्व. प्रमिला जाधव या माय-लेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अकाली निधनाने उमराणे परिसरावर शोककळा पसरली आहे.
उमराणे येथील विवाहितेसह माय-लेकाचा अपघाती मृत्यू; साखरपुडा आटोपून परतताना काळाचा घाला


























