मानवाने पुढे जाताना आपले व्यक्तिमत्व कसे घडवावे, याचे सार अंतगड सूत्र स्पष्ट करते. जीवन जगताना आपण अनेक गोष्टी फक्त वरवर पाहतो आणि तसेच जगतो. परंतु गहन चिंतनाचा अभाव राहतो. त्यामुळेच स्वतःचे आत्मपरीक्षण करून जीवनात बदल घडवणे आवश्यक आहे. हा बदल घडवण्यासाठी अंतगड सूत्र अत्यंत उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी केले.
त्यांनी सांगितले की, आत्मपरीक्षण करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारावा – “माझ्याकडे सर्व काही असूनही मला एकटेपणाची जाणीव का होते?” ही एकाकीपणाची भावना माणसाला सतत कुरतडत राहते. जवळचे नातलग, आप्तेष्ट असूनही कधी तेच परके वाटू लागतात. अनुभव सांगण्याची, विचार मांडण्याची इच्छा राहत नाही आणि त्यामुळे नातेसंबंधांत दुरावा निर्माण होतो.
एखादे काम वारंवार अडथळ्यांत अडकते, अपयशी ठरते, तेव्हा आपणच कधी दुसऱ्यांच्या कामात अडथळा ठरलो आहोत का, हे पाहणे गरजेचे आहे. जीवनात अडचणी आल्या की आत्मपरीक्षण आवश्यक आहे. आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो योग्य आहे का, समस्यांपेक्षा उपाय अधिक आहेत का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. यावरून आपले विचार कोणत्या दिशेने जात आहेत हे स्पष्ट होते. योग्य दिशेसाठी पुण्यकर्म आवश्यक असून, पुण्यकर्मानेच सुख आणि समाधान आपल्याकडे आकर्षित होते.
आपले व्यक्तिमत्व घडवू इच्छिणारा मनुष्य योग्य मार्ग स्वीकारून सतत चांगल्या कार्यासाठी प्रयत्नशील राहतो. सत्याचा मार्ग निवडणे हीच खरी साधना आहे. सत्य बोलल्याने संशय दूर होतो, समाधान मिळते आणि वाद मिटतात.
आपल्या शरीर, मन, आत्मा व इंद्रिये दाखवत असलेल्या अर्धसत्यापलीकडे पाहूनच खरे सत्य दिसते. कारण अर्धसत्य हे असत्यापेक्षाही धोकादायक असते. मात्र सत्य बोलताना परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. काही वेळा “दृष्टी आड सृष्टी” प्रमाणे काही भ्रम तसेच राहणेही श्रेयस्कर ठरते.
जीवनातील सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे – संशयाला स्थान देऊ नका. कितीही छोटा संशय असला तरी तो वादळ निर्माण करू शकतो. घरातील वा समाजातील कोणावर शंका आलीच तर संवादातून ती दूर करावी. वादापेक्षा संवादाला महत्त्व दिल्यास नातेसंबंध बळकट होतात. प्रत्येकाची कुणावर तरी श्रद्धा व आस्था असते; त्याला धक्का पोहोचवू नये. अन्यथा अविश्वास वाढतो. विश्वासानेच समाजाची चेतना वाढते.
शेवटी, प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी सांगितले – “मी” पेक्षा “आपण” महत्त्वाचे. सामुदायिक एकता, संघटन आणि सकारात्मक परिवर्तनासाठी आत्मपरीक्षण हेच खरे साधन आहे.


























