प्रेरणादायी व्यक्तिमत्व : प्राचार्य डॉ. संगीता राजेंद्र बाफणा
डॉ. संगीता बाफणा यांचा जन्म पारंपारिक मारवाडी समाजात झाला. त्या काळी मुलींच्या शिक्षणाला फारसं प्रोत्साहन नव्हतं. मुलींनी व्यावसायिक पदवी घेणं, करिअर करणे हे दुर्मिळ होतं. मात्र त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी अपार पाठिंबा दिला आणि शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना आधार दिला. पुढे त्यांचा विवाह श्री. राज बाफणा यांच्याशी झाला, ज्यांनी देखील शिक्षण व सामाजिक कार्यासाठी नेहमीच प्रेरणा दिली. डॉ. संगीता बाफणा या M.Sc., B.Ed., M.Ed., DTL, ICWA, M.Phil., Ph.D. या विविध पदव्यांनी विभूषित असून, गेली 32 वर्षे त्या शिक्षणक्षेत्रात अत्यंत समर्पितपणे कार्यरत आहेत. त्या नाशिक शहरातील ९८ वर्षांची परंपरा लाभलेल्या एक नामवंत SNJB शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यपदावर कार्यरत होत्या.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. डिजिटल लायब्ररी, वाचनालयांचे आधुनिकीकरण, महिलांचे सक्षमीकरण, ग्रामीण विद्यार्थिनींसाठी विशेष योजना, हेल्मेट वापर प्रबोधन, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकमुक्त मोहिम, हेल्मेट वाटप आणि वृक्षारोपण असे अनेक उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले आहेत.
त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता नैतिक मूल्ये, डिजिटल ज्ञान, वक्तृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे धडे दिले आहेत. आज त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून त्यांनी मिळवलेले शिक्षण हेच डॉ. बाफणा यांच्या कार्याचे मोठे फळ आहे.
त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जिल्ह्यातील आदर्श प्राचार्या ठरल्या आहेत.
डॉ. संगीता बाफणा यांच्या मते, शिक्षक हा विद्यार्थ्यांचा केवळ ज्ञानदाता नसून तो व्यक्तिमत्व घडवणारा शिल्पकार असतो. त्यांचं स्वप्न आहे की प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर, सजग आणि समाजाभिमुख नागरिक म्हणून घडावा.
आपल्या शैक्षणिक कामगिरीसोबतच त्या सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक विद्यार्थी, महिला आणि पालक एक नवी दिशा घेऊ शकले आहेत.
आज डॉ. संगीता बाफणा या आपल्या कार्यातून समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी नेहमीच समर्पित आहेत.
त्यांच्या कार्याची प्रेरणा अशीच नवी पिढी घडवत राहो हीच सदिच्छा!






















