मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस १९ ऑगस्ट हा “समाज दिन” म्हणून दरवर्षी साजरा करण्याची परंपरा १९८२ पासून सुरू असून, या दिवशी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा संस्थेच्या कार्याची १११ वर्षे पूर्ण होत असून, ५०८ शाखांचा भव्य वटवृक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.समाज दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालय,नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्व. अॅड. बाबुराव ठाकरे स्मृती अभिमुखीकरण आठवडा” अंतर्गत सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथील वरिष्ठ अधिवक्ता अॅड. श्रीकांत कानेटकर तसेच भारतीय बार कौन्सिलचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. जयंत जायभावे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी भूषविले.मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या गडाख यांनी मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले.या आठवड्यातील व्याख्यानमालेचा प्रारंभ अॅड. श्रीकांत कानेटकर यांच्या “दस्तऐवजाची नोंदणी व नोंदणी न केल्याचे परिणाम” या विषयावरील सखोल व उपयुक्त व्याख्यानाने झाला. त्यांनी कायदेशीर व्यवहारांमध्ये दस्तऐवज नोंदणीचे महत्व, नोंदणी न केल्यास उद्भवणारे परिणाम, तसेच न्यायालयीन दृष्टिकोनातून होणारे परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले. उपस्थित विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विषयावर मोठ्या उत्साहाने प्रश्नोत्तरांचा लाभ घेतला.हा विशेष उपक्रम दि. १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान सातत्याने पार पडणार असून, विविध क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ज्ञ, वरिष्ठ अधिवक्ते आणि न्यायालयीन अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेत कायद्याच्या विविध शाखांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उलगडले जाणार असून, हे मार्गदर्शन कायद्याचे विद्यार्थी, नवोदित वकिलांसह प्रात्यक्षिक अनुभव घेणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी मनःपूर्वक परिश्रम घेतले. यावेळी बार कौन्सिलचे सदस्य, ज्येष्ठ वकिल, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कायद्याचे सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर न्यायालयीन व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक अंगाची जाणही मिळणार असल्याने हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाज दिनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरणार आहे
(कल्पेश लचके)






















