लासलगाव(आसिफ पठाण)
येथील मनिषा दगू मढवई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित २०२३ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत महसूल सहाय्यक पदावर निवड निश्चित केली आहे.त्यांची नेमणूक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (अन्न व नागरी पुरवठा शाखा) येथे झाली असून त्या नुकत्याच कार्यावर रुजू झाल्या आहेत.
मनिषा मढवई यांचा २०२३ ते २०२५ या कालावधीतील विविध पदांवरील निवडीचा आलेख सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला आहे. या यशापूर्वी, त्या जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आणि विशेष म्हणजे, २०२३ मध्ये झालेल्या TAIT (शिक्षक पात्रता) परीक्षेद्वारे देखील त्यांची शिक्षक पदासाठी निवड झाली होती. एकाच वेळी गृहिणीची जबाबदारी, खाजगी शिकवण्या आणि MPSC चा अभ्यास या तिन्हीचा योग्य समन्वय साधत त्यांनी परिश्रमाच्या, एकनिष्ठतेच्या आणि उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर हे मोठे यश संपादन केले आहे.
त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल डायनॅमिक करिअर पॉईंट (डी.सी.पी. वर्ग) तर्फे नुकताच एक भव्य गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी योगेश पाटील,डॉ.विलास कांगणे,महेश पाटील,दर्शन साबद्रा,ब्रिजेश पारिक,रितेश उपाध्ये,गणेश राठी,संदीप कर्डक,महेंद्र पाटील,सचिन गायकवाड,संदीप पांडे,संदीप जगताप,विजय होळकर,सचिन विंचू आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंदाबाई बहुउद्देशीय संस्था, लासलगावचे अध्यक्ष मढवई डी. डी.आणि संस्थेच्या सचिव सौ. मढवई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या प्रसंगी शिक्षक दीपक कदम,कन्हैयालाल शेवलेकर,सागर लोखंडे,गणेश खुडे,रंजीत खांडेकर आदी उपस्थित होते.


























